esakal | योगासाठी मानसिक वातावरण

बोलून बातमी शोधा

yoga

शरीरातील प्रत्येक अंगाप्रमाणेच योगातील अष्टांगाचीही आवश्यकता आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील पहिले अंग ‘यम’ (Social Code of Conduct) आज आपण पाहू.

योगासाठी मानसिक वातावरण
sakal_logo
By
देवयानी एम.

आपण आतापर्यंतच्या लेखांत योगाची प्राथमिक भूमिका, योग का आवश्यक आहे, आहाराबाबत कसा विचार करावा आणि योगाची व्यापकता जी आपल्या आयुष्याच्या सर्व पैलूंवर मार्गदर्शन करू शकते, हे पाहिले. आता विषय थोडा पुढे नेऊ आणि महर्षी पतंजलींच्या मूळ अष्टांग योगदर्शन शास्त्राचा आढावा घेऊ. शरीरातील प्रत्येक अंगाप्रमाणेच योगातील अष्टांगाचीही आवश्यकता आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील पहिले अंग ‘यम’ (Social Code of Conduct) आज आपण पाहू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खालील पाच यमांना पतंजलींनी महाव्रते असे संबोधले आहे
अहिंसा
मनुष्याचे व्यवहार शरीर, वाणी आणि मनाशी संबंधित असतात. आपल्या वागण्याने, म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक यांपैकी कोणत्याही प्रकारे इतरांना दुःख होणार नाही म्हणजे अहिंसा! इतर म्हणजे मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांना आपल्या शारीरिक हालचालींनी त्रास होईल असे वर्तन म्हणजे त्यांच्याप्रती हिंसा. व्यवहारात असे प्रसंग येतात जेव्हा अहिंसेचे कटाक्षाने पालन होत नाही. उदाहरणार्थ- डास, ढेकूण मारणे. अशा वेळी मनाची ठेवण अशी असावी, की ही हिंसा आपल्याकडून अपरिहार्य कारणाने होत आहे व त्यांना दिलेल्या पीडेने हळहळ वाटत आहे. अशाने दुसऱ्यांच्या दु:खाविषयी आपल्यातील निष्काळजीपणा व निष्ठुरपणा कमी होईल. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला दुःख होईल असे कठोर बोलणे किंवा उपहास, निंदा करणे म्हणजे वाचिक हिंसा. कोणाच्या अनुपस्थितीतही अशा प्रकारे बोलणेही हिंसाच! सर्वांत कठीण मानसिक अहिंसा पाळणे, कारण मनात हिंसात्मक विचारच येऊ न देणे अत्यंत कठीण. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे चित्ताची प्रसन्नता ठेवायचा सराव केल्यास हळूहळू निर्वैर राहण्याचा अभ्यास होऊ शकतो. पतंजली यासाठी काही उपायही सांगतात. त्यासाठी योगसूत्रांचा नक्की अभ्यास करावा.

सत्य 
सत्याचे आचरण म्हणजे आपल्या वागण्यात-बोलण्यात खोटेपणा असू नये. मात्र, व्यवहारात खरे बोलण्याने कोणाचे मन दुखावणार असल्यास ती वाचिक हिंसा होईल. महाभारतात सांगितल्याप्रमाणे ‘सत्य आणि प्रिय असेल ते बोलावं, सत्य आणि अप्रिय बोलू नये’. पण प्रिय बोलण्याच्या नादात खोटे बोलले जात असल्यास तेही योग्य नाही. अशा वेळी न बोललेलेच उत्तम! म्हणजेच व्यवहारात तारतम्य बाळगावं.

अस्तेय 
अस्तेय याचा सरळ अर्थ आहे चोरी न करणे. एखाद्याची वस्तू किंवा विचार त्याला न कळवता घेणे ही चोरी आहे. फक्त स्वतःपुरता उपभोगात्मक विचार करणे, कोणाचेही पैसे, अधिकार, स्वातंत्र्य, त्याच्या कामाचे श्रेय आपण घेतल्यास ती चोरीच आहे.

ब्रह्मचर्य 
योग साधण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे हे व्रत. सामान्यतः लैंगिक सुख वर्ज्य करण्याला ब्रह्मचर्य म्हणतात. पण पूर्ण विचार करता लक्षात येईल, की आपले मन आणि बुद्धी हे इंद्रियांद्वारा विषयाकडे धावतात, त्यामुळे वासनेला आवर हे इंद्रियांच्या नियमनाने होणार आहे. ब्रह्मचर्याचा व्यापक अर्थ आहे ‘ब्रह्म चिंतनात अखंड राहणे’. ब्रह्म (चैतन्य तत्त्व/आत्मतत्त्व) + चर्या (अनुसंधान). ब्रह्मचर्य हे मन स्थिर करण्याचे साधन आहे.

अपरिग्रह
आपण जे मिळवतो ते आपल्या गरजेसाठी, ज्याच्यामुळे आपले पोषण, वर्धन, रक्षण होत असते. मात्र, आपण काही अनावश्यक गोष्टींचा संग्रहही करतो. वस्तूंचा विनाकारण संग्रह म्हणजे परिग्रह. कपाट उघडून किती टक्के कपडे व वस्तू गेल्या सहा महिन्यांत वापरल्या नाहीत, ते बघा! अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे तो अपरिग्रह.

जाती, देश, काल, समय यांपैकी काहीही या यमांच्या पालनाच्या आड येत नाही. कोणी रोज आसन, प्राणायाम, ध्यान करत आहे, पण त्याचे वागणे (म्हणजे यमांचे पालन) बरे नसल्यास त्याला योग साधणार नाही. या उलट योगाच्या नावाखाली ती व्यक्ती नुसती कर्मे करत राहील आणि अनेक वर्षे उलटल्यावरही योग आत उतरणार व मुरणार नाही. अष्टांगातील दुसरे अंग पुढच्या वेळी जाणून घेऊ!