योग ऊर्जा : अनिश्‍चिततेत आशेचा किरण

योग ऊर्जा  : अनिश्‍चिततेत आशेचा किरण

सध्या आपल्या आजूबाजूला, घरात, कामकाजात, मनात बरंच काही सुरू आहे. ‘A lot is going on in life’ असं अनेकांचं झालं आहे. या बरंच काही बरोबर अजून एक गोष्ट सर्वत्र पसरली आहे, ती म्हणजे ‘अनिश्‍चितता’. खरंतर या दोन्ही गोष्टी नेहमीच आयुष्यात असतात, परंतु गेल्या सहा महिन्यांच्या कोरोनाच्या काळात यांचं असणं प्रकर्षाने जाणवू लागलं आहे. हा काळ कठीण असला, तरी याचा उपयोग कसा करून घेता येईल असा विचार ठेवला तर नक्कीच असहाय आणि हतबल वाटणार नाही. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद झाले, उत्पन्न कमी झालं, नवीन येणारं काम आलं नाही, हातातले प्रोजेक्टस् गेले, नाती कोलमडली, विरह सहन करावा लागला, एक प्रकारची अपूर्णतेची भावना व पोकळी जाणवू लागली, परंतु बाहेर काहीही झालं तरी फुलांच्या उमलण्यात, सुगंध आणि सौंदर्य पसरवण्यात खंड पडत नाही, तसं आपल्या निर्धारात, नियमात आणि आचरणात अखंडता असावी. बाहेरील परिस्थितीचा गुलाम न होण्यासाठी दृष्टिकोन, स्थिरता, स्वाध्याय आणि कृती या चार पैलूंचं महत्त्व पाहू! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१) दृष्टिकोन 
डाळिंब सोलताना काही सडलेले, अतिपिकलेले दाणे जसे फेकून देतो, तसे अनावश्यक विचारांचं विलगीकरण करून त्यांना थारा देऊ नका. आजवर गोळा केलेले अनुभव, माहिती आणि वागण्याचा ढाचा आपल्या मनात कायम घर करून राहतात. वर्षानुवर्षे एकाच साच्यात राहिल्यामुळे त्याच विचारधारेत पुन्हा आपण गुंतून राहतो. सजगता आणि विवेकबुद्धी यांच्या संयोगाने जो दृष्टिकोन तयार होईल तो बाहेरील परिस्थितीशी दोनहात करायला मदत करेल. 

२) स्थिरता 
आपण शाळेतून कॉलेजमध्ये, तिथून नोकरी मग एका कंपनीतून दुसऱ्‍या कंपनीत किंवा व्यवसाय असं एकामागून एक रेल्वेच्या डब्याप्रमाणं काही ना काही सुरूच ठेवतो. नोकरी गेली, पैसे कमी मिळाले, करिअरमध्ये ब्रेक आला की आता पुढं काय करायचं या अनिश्‍चिततेनं आपण पार गोंधळून जातो. कारण सतत काही ना काही करण्याची सवय लागलेली असते. जसं आयुष्यातील प्रत्येक वर्ष भरलेलं असतं, तसंच दिवसातील प्रत्येक क्षण आपण खच्चून भरून ठेवतो. दोन गोष्टींमध्ये, कृतीमध्ये, विचारांमध्ये जागा (space) निर्माण केली तर जीवनात अचानक आलेल्या या बऱ्याच मोठ्या स्पेसनं गोंधळायला होणार नाही. रोज थोडा वेळ तरी निर्विचार, निःशब्द, निश्चल राहण्याची सवय लावावी. 

३) स्वाध्याय 
शाळा, कॉलेज, नोकरी किंवा व्यवसाय यांच्या गरजेपुरतं वाचन किंवा अभ्यास आपण करतो. तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर ते तुमचं प्रोफेशन आहे, संपूर्ण अस्तित्व नाही. कामापलीकडील विषयांचा अभ्यास, स्वाध्याय, चिंतन, मनन यासाठी दिवसातील काही काळ बाजूला काढा. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आपल्या अस्तित्वाला सखोलता देतो. अपूर्णतेची भावना कमी करतो. आयुष्यात रोल मॉडेल असणं फार महत्त्वाचं आहे. राष्ट्रपुरुष, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील आयकॉन्स् यांनी आयुष्याच्या कोंडीत सुद्धा मार्ग शोधून किती उत्तुंग कार्य केलं यानं प्रेरणा मिळते, जी आपल्या कठीण काळात आपल्याला साथ देते. 

४) कृती 
आजकाल सगळ्यांना सगळंच माहीत असतं. इंटरनेटमुळं थिअरी ठाऊक असते, विचारही सुरू असतात, परंतु कृती होत नाही. माहिती आणि ज्ञान यांच्यात फरक आहे कृतीचा. रोज नियमित पाळलेली दिनचर्या आणि योगाचा सराव होत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. गुलाबजामची रेसिपी वाचून किंवा व्हिडिओ बघून त्याच्या चाखण्याचा अनुभव येणार नाही, तसं आता कृती करा आणि अनुभव घ्या! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वरील सर्व मार्गांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मशागत आपण करत गेल्यास, सध्या सगळीकडून अंधारून आल्यासारखं वाटलं, तरी एखादा प्रकाशाचा किरण आपल्याला निश्‍चितच मार्ग दाखवू शकेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com