pranayam
pranayam

प्राणायाम नातं, मन आणि श्वासाचं!

योग ‘ऊर्जा’
देवयानी एम., योग प्रशिक्षक
Breath is not just air, it is Life!
आपलं जगणं अवलंबून असलेल्या श्वासाला ‘प्राण’ म्हणतात.
हठ प्रदीपिकेमध्ये म्हटलेय
चले वाते चलं चित्तं निश्चले निश्चलं भवेत् 

कुठल्याही प्रसंगी तुम्ही निरीक्षण करून पाहा. आपल्या मनाच्या अवस्थेचा श्वासावर सगळ्यात अगोदर परिणाम होतो. कधी राग आला, भीती वाटली, अस्वस्थता वाटली तर श्वासही अस्थिर होतो. याउलट झोपेत किंवा मन शांत असेल, तेव्हा श्वासही संथ आणि लयबद्ध असतो. मन आणि श्वासाच्या या नात्यामुळे प्राणायामाचा अभ्यास गरजेचा आहे. मनाच्या अवस्थेप्रमाणे श्वास बदलतो, याउलट प्रयत्नपूर्वक श्वासाच्या गतीमध्ये बदल केला तर मनाच्या अवस्थेत बदल घडू शकतो. ते शांत होऊ शकते. मनाला शांत हो सांगितलं, तर ते होणं खूप कठीण आहे. त्याच्या गतीबरोबर आपण तासनतास भटकत राहू. श्वासाच्या माध्यमातून मनाचं नियंत्रण करण्याचे शास्त्र म्हणजे प्राणायाम.
मागील लेखात पाहिल्याप्रमाणे एकदा आसन स्थिर, सुखकर आणि प्रयत्नशिथिलतेने (effortlessly) झाले की, शरीर प्राणायामासाठी तयार होते. आज आपण प्राणायामाचा अर्थ, त्याचे प्रकार आणि परिणाम पाहू.

प्राणायामाचा अर्थ 
निरोगी मनुष्य मिनिटाला साधारण १५ वेळा श्वास घेतो, म्हणजे दिवसाला २१ हजार ६०० वेळा. महर्षी पतंजली म्हणतात, ‘‘या नैसर्गिक गतीचा विच्छेद (breaking the pattern) म्हणजे प्राणायाम. मग तो मिनिटाला पंधरापेक्षा जास्त म्हणजे गती वाढवणे किंवा कमी करणे. श्वासोछ्वासाच्या स्वाभाविक गतीत प्रयत्नपूर्वक, प्रमाणबद्ध, विशिष्ट फळाच्या उद्देशाने बदल करणे म्हणजे प्राणायाम.

प्राणायामाचा परिणाम 
अशा प्रकारे केलेल्या प्राणायामाच्या अभ्यासाने चित्तातील रजोगुण आणि तमोगुण कमी होतात. भोगवृत्ती, वासना यांचे आवरण क्षीण होते. चित्तातील सत्त्वगुण वृद्धिंगत होऊन मनाची विषयाकडे (materialistic things) धावण्याची ओढ कमी होते आणि सहजच पुढील प्रवास म्हणजे पाचवे अंग ‘प्रत्याहार’ यासाठी योग्यता प्राप्त होते.
प्राणायाम करताना घ्यायची काळजी 
प्राणायाम करताना घाई करू नये.
नवे प्रयोग करू नयेत.
प्राणायाम करताना कोणताही त्रास झाला, थकवा किंवा अस्वस्थता जाणवली तर लगेचच तो बंद करावा.
टीव्ही, इंटरनेटवरून न शिकता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकावे.

अष्टांगयोगात प्राणायामापर्यंतच्या चार अंगांना बहिरंग योग म्हणतात, जिथेपर्यंत शारीरिक प्रक्रिया आवश्यक आहे. शेवटचे तीन अंग ‘धारणा-ध्यान-समाधी’ यांना अंतरंग योग म्हणतात. बहिरंग आणि अंतरंग योगाला जोडणारा सांधा ‘प्रत्याहार’ 

प्राणायामाचे प्रकार 
महर्षी पतंजली कुठल्याही प्राणायामाचे नाव न घेता, त्याचे चार प्रकार सांगतात.
फुफ्फुसातून बाहेर सोडला जाणारा श्वास म्हणजे ‘बाह्य वृत्ती’
आत घेतला जाणारा श्वास म्हणजे ‘अभ्यंतर वृत्ती’
श्वास-प्रश्वास यांच्यानंतर काही काळ टिकणारी अशी स्तब्ध अवस्था म्हणजे ‘स्तंभ वृत्ती’

या तीन अवस्थेतील श्वास हा ‘देश’, ‘काल’ आणि ‘संख्या’ या तीन घटकांच्या संयोगाने मिळून प्राणायाम बनतो.

देश : म्हणजे श्वास कुठे आहे, आत की बाहेर?
काल : तो किती वेळ आत किंवा बाहेर टिकतो?
संख्या : श्वासाची अशी किती आवर्तने होतात? 
या तीन घटकांच्या संयोगात सर्व प्रकारचे प्राणायाम समाविष्ट होतात.
बाहेर किंवा आत अशा कोणत्याही देशाची अपेक्षा न ठेवता केवळ स्तब्ध आहे, असा श्वास म्हणजे ‘केवल कुंभक’.

परंतु, ही अवस्था आपोआप येते, ज्यावेळी एकाग्र, विचारशून्य अशा सूक्ष्म अवस्थेत आपण पोचतो! मनाची चंचलता आणि वृत्ती शांत झाल्या की, प्राणवृत्तीदेखील सहजरीतीने सूक्ष्म होऊन स्थिर होतात आणि केवल कुंभक होतो. 
(श्वास घेण्या-सोडण्या पलीकडची स्तब्धता).

पुढील लेखात पाहू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com