शोध स्वतःचा : हळूहळू, मग अचानक!

आपल्यापैकी अनेकांना धावत-धावत गाडी पकडण्याची इतकी सवय असते, की आपण बहुतेकवेळा शेवटच्या क्षणीच जागे होतो.
शोध स्वतःचा
शोध स्वतःचाsakal

जे काही ‘अचानक झालं’ असं आपल्याला वाटतं, ते खरंतर हळूहळू खूप आधीच सुरू झालेलं असतं. एकतर आपलं त्याकडं लक्ष नसतं, कारण ते वरकरणी दिसत नाही किंवा जाणवत असूनही, त्याला आपण फारसं महत्त्व देत नाही. याचं कारण एक-रोजच्या जगण्यात त्याची बाधा होते, असं आपल्याला वाटत नाही आणि दुसरं-पुढं त्याचं स्वरूप काय होऊ शकेल याचं गांभीर्य ध्यानात येत नाही. आपल्यापैकी अनेकांना धावत-धावत गाडी पकडण्याची इतकी सवय असते, की आपण बहुतेकवेळा शेवटच्या क्षणीच जागे होतो. आरोग्य, आर्थिक परिस्थिती, नाती, ताणतणाव, तारुण्य, सवयी, उत्साह, उमेद, आनंद, समाधान हे अचानक खालावत नाहीत.

त्यांची कणाकणानं अधोगती होत जाते. गाडी जाईल तिकडे जाऊ दिली, तर अचानक एक दिवस रस्ता चुकला आणि ‘हे काय होऊन बसलं,’ असं वाटतं. पण ॲक्सलरेटर, ब्रेक आणि स्टिअरिंग हे तीनही कंट्रोल आपल्या हातात आहेत, हे विसरता कामा नये. त्यामुळं तुम्हाला जायचं कुठं आहे, किती वेगानं आणि थांबायचे किंवा दिशा बदलायची कधी हे तुमचं तुम्ही ठरवू शकता.

शोध स्वतःचा
चेतना तरंग : ही गोष्ट स्मरणात असू द्या!

परिणामांचा कंपाउंड इफेक्ट

कोणत्याही गोष्टीची आधी सुरुवात होते मग ती तशीच चालू राहिली, की त्यात त्यांच्या परिणामांचा ‘कंपाउंड इफेक्ट’ मिळतो. म्हणजे त्याची हळूहळू तीव्रता वाढत जाते. उदाहरणार्थ रोज व्यायाम केल्यास त्याचे फायदे दिवसागणिक वाढत जातात. खर्च हळूहळू वाढत गेला, तर महिन्याच्या शेवटी अचानक शिल्लक काहीच उरणार नाही. झाडाला पाणी घातलं नाही, तर रोज थोडं थोडं कोमेजून एक दिवस अचानक ते मरून जाईल. रोज थोडं थोडं जास्त खाल्लं गेलं तर एक दिवस अचानक वजन वाढलं असं वाटेल. रोज ताणतणाव वाढत गेले आणि चित्ताला शांतता देणारा अभ्यास रोज केला गेला नाही, तर एक दिवस अचानक ब्रेकडाऊन होईल. कोणतीही वाईट (हानिकारक) सवय किंवा व्यसन जर ‘फक्त आजचा दिवस’ किंवा ‘एवढ्याशाने काही नाही होणार,’ असं म्हणत चालू ठेवली तर एक दिवस अचानक एखादा अवयव निकामी होऊ शकतो. एखाद्या नोकरीत किंवा कामात खूष नसाल, तर रोज तिळ-तिळ जड मनानं जगण्यानं एक दिवस अचानक आयुष्याप्रतीची उमेदच हरवून बसण्यात काय अर्थ आहे?

शोध स्वतःचा
इनर इंजिनिअरिंग : मानव जातीचे खरे कल्याण

या सगळ्याचं तात्पर्य असं, की बदल हा थेंबे थेंबे होत असतो. आपण जागरुकतेनं जगत नसल्यानं आणि काही वेळा समजत असूनही ‘ठीक आहे बघू नंतर,’ अशी वृत्ती ठेवल्यानं अचानक होऊन बसलेल्या गोष्टींची सुरुवात आधीच झालेली आहे, याचा विचारही करत नाही. माणूस हा संकट येईपर्यंत कृती करण्यास प्रवृत्त होत नाही. मग ते वैयक्तिक पातळीवर असो किंवा जागतिक. कॅन्सरच्या पेशी आपल्या नकळत हळूहळू आतून शरीर पोखरत असतात, मग अचानक त्याचं अस्तित्व दाखवून देतात तेव्हा कठोर निर्णय व उपचार करावे लागतात. हवामानातील बदल व तापमानातील वाढ याहीबद्दल अजून बहुतांश लोक तटस्थ व बेपर्वा आहेत.

आता तुम्ही जरा विचार करा, तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अचानक झाल्या असं तुम्हाला वाटतं किंवा ज्यांच्याबद्दल तुम्ही नाराज आहात. एका वेळी एक विषय घेऊन त्यात कसा टप्प्याटप्प्यानं बदल होत गेला, याचा विचार करा. वजन कमी करण्याबाबत मला अनेक जण विचारतात ‘किती दिवसात कमी होईल?’ जर अनेक महिने किंवा वर्षांच्या कालावधीत ते हळूहळू वाढलं असेल आणि त्यावर तुम्ही काहीच प्रयत्न केले नसतील, तर अचानक एक दिवस आरोग्याच्या समस्या आल्या किंवा लग्न करायचं म्हणून कोणीतरी तरी वजन कमी करून द्यावं व त्याची जबाबदारीही दुसऱ्यानंच घ्यावी, अशी अपेक्षा ठेवणं हास्यास्पद आहे.

या व अशा असंख्य घटना आपल्या आत व बाहेर रोज होत असतात. याकडं सावधतेनं पाहण्याची गरज आहे. तरच हळूहळू झालेले बदल गंभीर स्वरूप धारण करून हाताबाहेर जाणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com