esakal | केले अथवा घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

केले अथवा घडले!

केले अथवा घडले!

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

आपल्या भूतकाळातल्या सर्व घटना ‘घडल्या’ असे समजा आणि वर्तमानकाळात ‘करायचे आहे किंवा करत आहे’ असे माना. भूतकाळातल्या गोष्टी ‘तुम्ही केल्या’ असे मानताच अहंकार आणि खेद आपल्यावर नियंत्रण करू लागतात. त्याचप्रमाणे वर्तमानात घडणारे सगळे ‘होत आहे वा घडत आहे,’ असे मानल्याने आळस आणि अनवधान बळावतात. याचप्रमाणे भविष्याकाळावर ‘कर्तेपण’ लादल्याने ताणतणाव निर्माण होतात. भविष्यात जे व्हायचे, ते ‘होणार’ आहे असे समजल्याने विश्वास येतो, पण त्याचबरोबर आळससुद्धा येऊ शकतो. म्हणून ‘घडणे’ भूतकाळापुरते ठेवा, ‘करणे’ वर्तमानासाठी आणि या दोन्हींचे योग्य प्रमाणात मिश्रण भविष्यासाठी असू द्या.

ज्ञानी व्यक्ती मात्र ‘घडण्या’मध्ये ‘करणे’ आणि ‘करण्या’मध्ये ‘घडणे’ एकाचवेळी पाहात असते. जर कुणी शत प्रतिशत ‘कर्म करीत’ असेल, तर त्यालाच ‘घडत असल्याची’ सुद्धा जाण असते. आता या सर्व विधानांनी तुमचा मानसिक गोंधळ झाला का? (हशा) जो कुणी खूप सारे काम करतो, तो ‘मी खूप केले,’ असे कधीही म्हणत नाही. जेव्हा आपण खूप काम ‘केले’ असे कुणी म्हणतो, तेव्हा तो आणखी अधिक करू शकला असता, असे समजावे. त्याने आपल्या क्षमतेनुसार केलेले नाही. ‘कर्तेपणाची’ भावना तुम्हाला जेवढे थकवते, तेवढे काम थकवत नाही. कर्तेपणाची भावना न ठेवता शंभर टक्के कार्य करीत राहा.

तुमच्या जवळ असलेली सर्व कौशल्ये ही इतरांसाठी आहेत. तुमचा आवाज चांगला असेल, तर तो इतरांनी ऐकण्यासाठी. तुम्ही चांगला स्वयंपाक करीत असाल, तर तो इतरांसाठी. तुम्ही एक चांगले पुस्तक लिहिलेत, तर ते इतरांनी वाचावे म्हणून. तुम्हीच बसून स्वतः लिहिलेले पुस्तक वाचणार नाही! तुम्ही चांगले सुतारकाम करीत असाल, तर ते इतरांसाठी! तुम्ही चांगले डॉक्टर वा सर्जन असाल, तर तेही इतरांसाठी. तुम्ही स्वतःवरच शस्त्रक्रिया करणार नाही! तुम्ही चांगले शाळा-शिक्षक असाल, तर ते इतरांना शिकवण्यासाठी. अशा प्रकारे तुमची सर्व कुशलता आणि तुमचे सर्व काम हे दुसऱ्यांच्या भल्यासाठी असते.

तुमच्या सर्व कौशल्यांचा आणि गुणांचा पूर्णपणे उपयोग करा. त्यांना वापरा, अन्यथा ती तुम्हाला पुन्हा दिली जाणार नाहीत!

loading image
go to top