शोध स्वतःचा : मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शोध स्वतःचा : मदतीचा हात

शोध स्वतःचा : मदतीचा हात

आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात, मार्गदर्शनाची गरज उद्‍भवते, पुढे कसं जावं समजत नाही, अडकल्यासारखं वाटतं किंवा फक्त वैचारिक साथ हवी असते. अशा वेळी कुठल्या ना कुठल्या रूपाने उत्तर आपल्यापर्यंत येतं, तो मार्गदर्शनाचा हात मिळतो, हवी असलेली साथ मिळून जाते. मात्र त्यासाठी उत्तराची ओढ आणि कुलपात किल्ली फिट बसते तशी मिळालेला हात हातात घेण्याचं समजलं पाहिजे.

एक माणूस वादळी रात्री आपल्या घरापासून दूर नदीच्या पलीकडे अडकला होता. त्याने मदतीसाठी देवाकडे प्रार्थना केली. तेवढ्यात एक माणूस बोट घेऊन आला. परंतु मदत नाकारत तो म्हणाला, ‘‘माझा देव मला मदत करेल.’’ काही वेळ तो त्याच ठिकाणी होता आणि देवाची प्रार्थना करत राहिला. पुन्हा एक माणूस आला परंतु याने परत मदत घेण्यास नकार देत तेच कारण दिले. हे आणखी एकदा घडले आणि त्यानंतर लगेचच तो माणूस मरण पावला. स्वर्गात गेल्यावर त्याने देवाला विचारले की इतकी प्रार्थना करूनही त्याने मदत का केली नाही?

तुम्ही अंदाज लावूच शकता की देवाने काय म्हटले असेल...?

आपल्याला अपेक्षित स्वरूपातच मदत पोहोचेल असं जरुरी नाही. आपल्या गरजेच्यावेळी आपल्याला जे हवं ते मिळतं तेव्हा आपल्या पाठीशी अज्ञात शक्तीचा हात आहे असं समजावं. त्या शक्तीची प्रचिती कशी येते? जेव्हा तुमच्या हृदयाला एखाद्या गोष्टीचा स्पर्श होतो! डोळ्यांना दिसत नसलेल्या गोष्टी जाणवण्यासाठी ती शक्ती आपल्याला योग्य त्या व भावतील अशा स्पंदनांचा अनुभव देते. तो सिग्नल समजून घेण्यासाठी आपल्या जाणिवेची पातळी उंचावणे हे आपण जरूर केले पाहिजे.

कधीकधी मला वाटतं की जवळच्या आणि प्रिय व्यक्तींशी बोलणे हे देवाशी बोलण्यासारखे आहे. बिनशर्त पाठिंबा, प्रेम आणि आपल्याला समजून घेणे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. माझ्या काही प्रिय व्यक्तींशी झालेल्या संभाषणातील काही भाग तुम्हाला सांगते.

  • तुमच्या क्षमतेला पुरेसं यश मिळत नाही तेव्हा लोक तुमच्या कर्तृत्वाबद्दल साशंक असतात. त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यात क्षमता नाही. याचा अर्थ तुम्हाला स्वतःला आणखी पॉलिश करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून ती दिसून येईल. स्वत:शी स्पर्धा करून जीवनाचा खेळ खेळा. कोणतेही कर्म १०० टक्के देऊन केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही काय साध्य करू शकता. नुसतं क्षमता माहीत असून उपयोग नाही त्या इतरांना दृश्य स्वरूपात दिसले पाहिजे.

  • तणाव येतो तेव्हा लक्षात ठेवा थोडा तणाव नेहमीच चांगला असतो. तो तुम्हाला सजग ठेवतो.

  • जेव्हा तुम्हाला खूप काही करायचे असते पण प्रयत्न करूनही अडकल्यासारखे वाटते, तेव्हा स्वतःच्या क्षमतेवर, कौशल्यावर विश्वास ठेवा परंतु संयम सुटू देऊ नका. नारायण मूर्ती एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘‘It took me 25 years to be an overnight success’’

  • एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा मन सकारात्मकतेनं अगदी भरून गेलेलं असतं, पण ते कमावलेलं गमावण्याची भीती ही वाटते. नेहमीच चांगला काळ असावा असा हा लोभ आहे की शर्यतीत टिकून राहण्याची धडपड? हे यशाचे स्वरूप आहे. यश येताना अशा सगळ्या भावना घेऊन येतं. खंबीर राहा. हिंमत करणाऱ्यांच्या पाठीशी कोणत्या न कोणत्या रूपाने मदतीचा हात कायम असतो!

loading image
go to top