esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या हाती, तुमची ‘श्रद्धांजली’!

तुमच्या हाती, तुमची ‘श्रद्धांजली’!

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

आपलं अस्तित्व म्हणजे कुणाची तरी निर्मिती! निर्मितीच्या साखळीमध्ये आपल्या पूर्वजांनी ‘डीएनए’द्वारे आपल्यापर्यंत ‘गुण’ पाठवलेले असतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहणं आवश्यक आहे.

शाळेच्या ग्राउंडवर लांब अंतरावर, पांढरी फक्की मारून दोन रेषा आखलेल्या असतात. विद्यार्थ्यांचा ‘स्टॅमिना’ तपासण्याच्या या खेळात, शिट्टी वाजल्यावर पळत जाऊन समोरासमोरच्या रेषांना हात लावायचा असतो. सरांनी शिट्टी वाजवून थांबवेपर्यंत हा खेळ सुरू राहणार असतो. शिट्टी वाजते. मुलं पळायला लागतात. सुरुवातीला पळण्यात उत्साह असतो. पळापळी दरम्यान हसणं खिदळणं सुरू असतं. हळूहळू मुलं दमायला लागतात. जोश कमी होत जातो. काहीजण पळण्याऐवजी चालायला लागतात. काहीजण एकमेकांचा आधार देतात. तेवढ्यात सरांचा आवाज येतो, ‘शेवटच्या दोन राउंड!’ हे ऐकल्यानंतर पुन्हा उत्साह संचारतो. थकलेली मुलं देखील आता वेगाने पळायला लागतात....तुमचं-आमचं आयुष्य जन्म-मृत्यूच्या अशाच दोन समांतर रेषांमध्ये सुरू आहे. या खेळात शेवटची शिट्टी येईपर्यंत तुम्हाला खेळायचं आहे. तेही हसत-खेळत आनंदानं, वेळप्रसंगी एकमेकांना आधार देत.

ज्यांच्या मृत्यूची शिट्टी वाजते त्यांच्याबद्दल पूर्वी लोकं तासनतास बोलायचे, आठवणीत रमायचे. सध्याच्या गतीमान काळात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ किंवा ‘RIP’ एवढ्यावरच ते आता येऊन ठेपलं आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य दिलं , सर्वस्व अर्पण करून जगाचा निरोप घेतला त्या मागच्या पिढीबद्दलच्या थोड्या तरी अधिक आठवणी काढायला हव्यात ना?

श्राद्ध पक्षात विधी होतात. त्यानंतर गप्पांदरम्यान जुन्या पिढीच्या आठवणी निघतात. त्या व्यक्तीनं दिलेली शिकवण लोक आवर्जून बोलतात... कल्पनाशक्तीचा एक खेळ आपण खेळून बघूया. त्यासाठी जरा डोळे मिटून घ्या. क्षणभर कल्पना करा, तुमच्याच श्राद्धासाठी लोकं जमले आहेत. ते तुमच्याबद्दल बोलत आहेत. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी एकएक करून डोळ्यासमोर आणा. ते काय बोलतील याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतील, कदाचित एकमेकांशी हळूच बोलताना वाईट आठवणी देखील काढत असतील. त्यांना आलेल्या अनुभवातून ते बोलत असतील. कल्पनाशक्तीच्या या खेळात तुम्ही अस्तित्वात नसल्यानं तुम्हाला फक्त ऐकता येणार आहे, त्यांना थांबवता येणार नाही. तुमच्याबद्दल सकारात्मक बोलत असतील, तर मन सुखावेल. पण नकारात्मक ऐकताना क्लेश होतील. तुम्हाला तुमची बाजू मांडावीशी वाटेल. पण तुम्हाला तसं करता येणार नाही. कारण तुम्ही मेलेले आहात! तुम्ही ऐकलेलं मनाच्या कागदावर टिपून ठेवा आणि अलगद डोळे उघडा. अभिनंदन! तुम्ही अजूनही जिवंत आहात. कल्पनेमध्ये लोकांनी जे बोलणं अपेक्षित नव्हतं, ते चांगल्या वागण्यानं बदलण्याची अजूनही तुम्हाला संधी आहे.

कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट लिहिणारे साहित्यिक, लेखक असतात. पण आता वेळ आली आहे तुम्ही लिखाण करण्याची! अर्थपूर्ण आयुष्य जगायचं असेल, तर स्वतःची श्रद्धांजली स्वतःच लिहूया! नंतर लोकांनी काय बोलायला हवं त्यासाठी आपण आजच काम करूया. कदाचित तुम्ही दमलेले असाल. पण, शाळेच्या मैदानावर ज्याप्रमाणं तुम्ही पुन्हा उत्साहानं पळायला लागला होतात तसंच पळूया. कारण आयुष्याच्या मैदानात अजूनही शेवटची शिट्टी वाजायचे आहे !!!

loading image
go to top