हसण्यासाठी जगा; मनाचा सूक्ष्मदर्शक , शब्दांचा मार्गदर्शक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

myfa

हसण्यासाठी जगा; मनाचा सूक्ष्मदर्शक , शब्दांचा मार्गदर्शक

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

सध्या लोकं पिकनिकसाठी बाहेर पडायला लागले आहेत.  निसर्गातील झाडं, फुलं, प्राणी, पक्षी, सूर्योदय- सूर्यास्त, डोंगर-दऱ्या, पाणी या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला आनंद होतो.  यातून मानसिक स्वास्थ्य लाभतं. या गोष्टींप्रमाणेच  आपल्या  आयुष्यात हिरवळ निर्माण करणाऱ्या किंवा वाळवंट निर्माण  करणाऱ्या एका गोष्टीकडं पाहायची वेळ आली आहे, ते म्हणजे ‘शब्द’!

क्षणभर आठवून पाहा ‘तुम्ही  बोलत असलेल्या शब्दांना कधी मनाच्या सूक्ष्मदर्शकातून निरखून पाहिलं? कपड्यांप्रमाणं त्यांना कधी पारखून पाहिलं?’ शब्दांमध्ये प्रचंड शक्ती आहे. ते आयुष्य घडवतात किंवा बिघडवतातसुद्धा!  

लहान मुलं आजूबाजूला असलेल्यांचं बोलणं ऐकत असतात. त्यांनी वापरलेले शब्द ते नकळत वापरून पाहतात. एक दिवस ते लहान मूल पटकन बोलतं ‘ अक्कल नाही का? बिनडोक!’  सगळेजण हसायला लागतात. कारण अर्थ माहीत नसताना, मनात कोणताही विचार नसताना त्याच्या तोंडून येणारे शब्द  हास्य निर्माण करतात. पण समजा हेच शब्द प्रियकरानं प्रेयसीच्या आई-वडिलांबद्दल बोलले,  तर ती त्याला बिलकूल माफ करणार नाही. कारण विचार करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीनं बोललेले शब्द, त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत असतात.

सकारात्मक जगण्यासाठी, बोलण्यातदेखील बदल करावा लागतो. तुमच्या आमच्या आयुष्यात वेगवेगळ्या विषयांवर बोलताना, नकारात्मक बोलणं सकारात्मकपणे कसे मांडायचे हे समजावून घेऊया.

आरोग्य : नकारात्मक माणसं बोलतात, ‘शरीर साथ देत नाही. म्हातारपण आलंय. आता आमचं काय राहिलंय.’ सकारात्मक माणसं म्हणतात, ‘व्यायाम करून मी  ठणठणीत होणार. वय हा फक्त आकडा आहे. जगाचा अनुभव गोळा करण्यासाठी, मनाचा कोनाडा तयार आहे!’

सामाजिक :  नकारात्मक माणसं बोलतात, ‘जग मूर्खांनी भरलेलं आहे. माझं कुणाशीच पटत नाही.  लोकं माझा गैरफायदा घेतात.’ सकारात्मक माणसं म्हणतात, ‘मला नेहमी चांगलीच माणसं भेटतात. भरपूर मित्रमंडळी आणि  सहकारी यांनी माझं आयुष्य फुललेलं आहे. समाजासाठी मला काम करता येतं याचं मला समाधान आहे.’

नोकरी-व्यवसाय :  नकारात्मक माणसं बोलतात, ‘करिअरमध्ये आता काही भवितव्य राहील नाही. इंडस्ट्रीतल्या अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. लवकरच आमची कंपनी बंद पडेल.’ सकारात्मक माणसं म्हणतात, ‘नवनवीन करिअरच्या  संधी तयार होत आहेत. इंडस्ट्रीतल्या कंपन्या बंद पडत असताना, आमची कंपनी टिकवून ठेवली... तर भविष्यात खूप फायदा होईल.’

आर्थिक :  नकारात्मक माणसं बोलतात, “पैसा टिकत नाही. कर्जात बुडलो आहे. तंगी आहे. मार्केट एकदम डाउन आहे.’ सकारात्मक माणसं म्हणतात, ‘गुंतवणूक कशी करायची हे मला शिकायचं आहे. या जगात ‘लोन’ घेतलेला मी ‘अलोन’ नाही!  कमी खर्चात सुद्धा आनंदात राहता येतं याचा अनुभव घेतो आहे. अर्थव्यवस्था टाकते आहे कात, आता होईल समृद्धीची बरसात!’

तुमच्या मनातल्या भावना व  विचारांच्या शक्तीतून  शब्द जन्माला येतात. वारंवार तेच बोलण्यातून दृढ विश्वास तयार होतो. यातून सकारात्मक अथवा नकारात्मक कृती घडते. त्याचे परिणाम मनातल्या विचारांना बळकटी देतात. यातून पुन्हा तेच चक्र सुरु राहतं. पुढे पुढे सवयीने तसेच शब्द नकळतपणे बोलले जातात.   सकारात्मक शब्दांचा शब्दकोश उघडा. ‘मस्त, मजेत, आनंदात, झकास, फर्स्टक्लास’ या व अशा सकारात्मक शब्दांशी मैत्री करा. आपल्या आयुष्याला चांगल्या शब्दांची फळं लगडली, तर आनंदाचा बहर नक्कीच येईल!

loading image
go to top