हसण्यासाठी जगा : दररोज करूया, आनंदी मनांची दीपावली!

diwali
diwalisakal

काही लोकं सतत काळजी करत जगतात, तर काही काळजीपूर्वक जगतात.  काळजीपूर्वक वागणारी  माणसं प्रत्येक गोष्टीचा बारकाव्याने विचार करतात. कोणत्याही गोष्टीचा सुयोग्य वापर  कसा करता येईल, याचा विचार  करून ते कृती करतात. ‘वायफळ खर्च न करणं म्हणजे उत्पन्न मिळवल्यासारखंच आहे,’ असा त्यांचा विचार असतो.  कोणतीही गोष्ट वाया जाणार नाही याची ते काळजी घेतात.

  • काही लोकं टूथपेस्ट संपली म्हणून त्याची ट्यूब फेकून देतात, तर काहीजण ट्यूब बोटाने दाबून दाबून, लाटण्याचा वापर करून, खालच्या बाजूने मुडपून टूथपेस्टचा परिपूर्ण वापर करतात. शाम्पूच्या बाटलीत थोडं पाणी घालून, ती हलवून, विसळून पूर्ण वापरतात. अंघोळीच्या साबणाचे तुकडे एकत्र करून नंतर ते वापरतात. कोणती गोष्ट ते वाया घालवत नाहीत.

  • शिळा भात, अती पिकलेलं केळ, खराब भाग झालेली फळं, आदल्या दिवशीचं वरण आणि भाज्या ंचा लोक वापर करतात. फोडणीचा भात, केळाची दशमी, साखरांबा, थालपीठ, पंचामृत हे पदार्थ बचतीचा उत्कृष्ट नमुना आहेत. एखादी गोष्ट फेकून देण्याऐवजी, त्याचा पुनर्वापर करण्यात काही गृहिणींचा हातखंडा असतो. त्या कोणती गोष्ट वाया जाऊ देत नाही.

  • एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, एअरपोर्टवरती लोकं वाट बघत बसतात. पण त्याच वेळात काही लोकं मोबाईल वरून ई-मेलला उत्तर देतात, लेखक लोकांच्या वागणुकीतून कथा शोधतात, कलाकार अभिनयासाठी एखादं ‘कॅरेक्टर’ शोधतात. ही लोकं वेळ वाया जाऊ देत नाही.

  • काही लोक जगण्याशी संबंध नसलेल्या अनावश्यक गोष्टींबाबत तासनतास गप्पा मारतात. तर काहीजण त्याच वेळात आपल्या आयुष्याशी निगडीत प्रश्नांवर विचार करतात, इतरांचा सल्ला घेतात. उत्तरं शोधून मनातला ताण कमी करतात. ही लोकं विचार करण्याची क्षमता वाया घालवत नाहीत.

  • काही लोकं शक्य असेल तिथं चालत जाऊन, पेट्रोल वाचवून प्रदूषण कमी करतात. वाया जाणारं पाणी थांबवतात. रस्त्यावरचा कचरा उचलतात. वृक्षतोड होणार नाही यासाठी झगडतात. निसर्गाचं सौंदर्य आणि निसर्गाची क्षमता वाया जाणार नाही याची ते काळजी घेतात.

‘वस्तू वाया जाऊ नये याची ज्याप्रमाणे आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे आयुष्य तर वाया घालवत नाही ना?’ याचा विचार प्रत्येकानं करण्याची वेळ आली आहे. मानसिक ताणतणाव यामुळं लोकं मनानं खचतात. उद्दिष्टहीन जगण्याचा मार्ग स्वीकारतात. नव्याचा ध्यास आणि वैभवाची आस घेऊन प्रत्येकजण दीपावली साजरा करतो. अशावेळी निराशावादी लोकं भेटतात. निराश मनं म्हणजे विझलेले दिवे! अशी लोकं ‘ सध्या काही खरं नाही. काही बदलणार नाही, आता आमचं काय राहिलंय, जेवढं मिळाले तेवढं आयुष्य कसंबसं काढायचं,’ असं विझलेल्या मनाचे विचार बोलत असतात.

‘वाया जाणारं आयुष्य थांबवणं’ ही समाजातील सर्वांत मोठी बेरीज आहे. सध्याच्या काळात लोकांना सकारात्मक करणं, जगण्याची उमेद देणं, हसवणं हेसुद्धा मोठं सामाजिक काम आहे. प्रत्येकाने आजूबाजूला असलेल्या लोकांसाठी दररोज एक तास हे काम केलं तर समाज नक्की बदलेल. वर्षातून एकदा नाही तर दररोज दीपावली साजरी होईल! निराश मनात हास्यदीप प्रज्वलित करून आपण आनंदी आयुष्याची दीपावली साजरी करूया!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com