इनर इंजिनिअरिंग : नैतिकता मानवतेची नक्कल

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
 इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माण
इनर इंजिनिअरिंग : भव्य भारताचे निर्माणsakal

आपण हे समजावून घेतलं पाहिजे की, भारत ही एक नैतिकतारहित संस्कृती आहे. तुम्हाला शिकवण्यासाठी दगडांमध्ये अशी कोणतीही नीतिमूल्ये कोरून ठेवलेली नाहीत, जी तुम्हाला सांगतील, ‘‘तुम्ही असं करा किंवा तुम्ही असं करू नका.’’ आपण कधीही नैतिकतेवर अवलंबून नव्हतो, कारण आपण असे मानव निर्माण केले, जे मानवतेला प्रचंड प्रमाणात प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी सक्षम होते.

त्यामुळे पिढी दर पिढीत नैतिकता किंवा नैतिक मूल्यांची आवश्यकता कधीही भासली नाही. तुमची मानवता पूर्णतः विकसित झाली असेल आणि ती निरंतर ओसंडून वाहत असेल, तर तुम्हाला कोणत्याही नैतिकतेची गरज नाही. नैतिकता ही मानवतेची नक्कल आहे. नैतिकता समाजातील काही गोष्टींचा बंदोबस्त करू शकेल, पण ती मानवाच्या आंतरिक स्वरूपात पूर्णपणे हाहाकार माजून टाकेल.

जाणीव विरुद्ध विवेक

नैतिकतेच्या मदतीने तुम्ही विवेक विकसित कराल, जाणीव नाही. सर्वकाही छान वाटत असताना ज्याला त्रास होतो, तो म्हणजे विवेक. तुम्हाला ज्याबद्दल अपराधी वाटते किंवा एखादी गोष्ट योग्य किंवा अयोग्य आहे असे तुम्हाला वाटणे ही एक सामाजिक घटना आहे. सामाजिक नीतिनियमांद्वारे ते तुमच्यामध्ये रुजवले गेले आहे. नैतिकता ही समाजाशी संबंधित आहे आणि ती भिन्न समुदायांमध्ये भिन्न प्रकारची असते.

इतिहासातील वेगवेगळे कालखंड आणि भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नैतिकता अस्तित्वात होती. तुमच्या आजीला जी गोष्ट अतिशय अनैतिक वाटत होती ती गोष्ट आज तुम्ही अतिशय निर्लज्जपणे करता. म्हणून काळ, परिस्थिती आणि व्यक्तीनुसार नैतिकता ही भिन्न स्वरूपाची असते. अस्तित्वाच्या दृष्टीने तिचे काहीही प्रयोजन नाही, पण तुमच्यातील मानवतेला अस्तित्वाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे.

तुमच्यामधील मानवता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी जिवंत आणि सक्रिय असती, तर कोणत्या प्रसंगी कसे वागावे, हे कोणीतरी तुम्हाला सांगायची गरजच भासली नसती. केवळ लोक त्यांच्यातील मानवता टिकवून ठेवण्यास असमर्थ ठरल्यामुळे समाजाने ती नैतिकतेद्वारे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाने नैतिक शिकवण घेतली असली, तरी आम्ही जगातील समस्यांचे निराकरण करू शकलो नाही.

नैतिकतेच्या आधारे तुम्ही फक्त तुमच्या भोवताली असलेल्या लोकांसोबत ढोंग करायला शिकलात. पण तुमच्यामधला सगळा मूर्खपणा तसाच चालू आहे. तुमच्यामधील मानवता पूर्णतः बहरली असती, तर तुम्हाला नैतिकतेची गरज भासली नसती. तुम्ही जसे आहात तसेच छान असता.

मानवतेसाठी तीन गुरुकिल्ल्या

मानवतेला प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी, आम्ही तीन मूलभूत तत्त्वे मांडली आहेत. पहिले, सृष्टी रचनेच्या स्रोताबद्दल संपूर्ण समरसता. हे आपल्या संस्कृतीत वेगवेगळ्या लाखो मार्गांनी दर्शविले आहे. जेव्हा आपल्याला एखादे गाव किंवा शहर उभारायचे असे, तेव्हा आपण सर्वप्रथम तिथे एक भव्य मंदिर उभारत असू.

या मंदिराचे बांधकाम करणारे कामगार झोपडीत राहत असत, पण त्यांनी अतिशय भव्य मंदिरे उभारली. विशेषतः दक्षिण भारतात हे प्रामुख्याने आढळून येते. इतर दोन मूलभूत तत्त्वे म्हणजे, तुमच्या भोवताली असलेल्या सर्व प्राणीमात्रां विषयी करुणा आणि स्वतःविषयी मात्र वैराग्य. ही तीन तत्त्वे तुम्ही जीवनात उतरवल्यास तुमच्यातील माणुसकी निरंतर जागृत राहील. नाहीतर तुमची माणुसकी नाहीशी होईल आणि तुम्हाला नैतिकतेचा बुरखा पांघरलेल्या बनावट माणसासारखे ढोंग करावे लागेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com