esakal | शोध स्वतःचा : कर्म तन्मयता
sakal

बोलून बातमी शोधा

शोध स्वतःचा : कर्म तन्मयता

शोध स्वतःचा : कर्म तन्मयता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुम्हाला सर्वांत जास्त काय करायला आवडतं?... पोहणं? स्वयंपाक? ड्रायव्हिंग? सायकलिंग? गायन? लिखाण? वाचन? कोणतं तरी वाद्य वाजवणं? कोडिंग? बागकाम? फोटोग्राफी? नृत्य? व्यायाम? कोणतीही कला? किंवा इतर काही असेल.

सर्व आवडीच्या कामांत आणि इतर कामांत काय फरक आहे? आवडीच्या कामात मन जोडलं जातं. आपण त्याच्याशी इतके एकरूप होऊन जातो, की भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरून वर्तमानात, फक्त त्या एका कर्मात पूर्णपणे विरघळून जातो. आणि तसं होताना वेळेचं भान राहत नाही. इतर व्यत्ययांचा त्रास होत नाही.

दुसरे कोणतेही विचार आपल्यावर मात करीत नाहीत. याउलट, जे काम करावसं वाटत नाही, पण ते करणं अनिवार्य आहे ते करताना एक मिनीटसुद्धा तासाप्रमाणे वाटतो. सारखं घड्याळाकडं पाहतो. ही कर्मात एकरूप होऊन विरघळण्याची प्रक्रिया आहे, त्यानं ते कर्म उत्तम होतंच, त्याचबरोबर आपल्याला खूप आनंदी करून जातं, तन्मयतेनं केलेल्या कर्माचं खूप समाधान असतं.

आपलं मन सारखं भरकटतं, वाचायला बसलो की शब्द डोळ्यांखालून जात असतात, पण मन तिथं नसतं. त्याचा मी मागच्या एका लेखात उल्लेख केला होता. आज आपण या भरकटणाऱ्या मनाला एका जागी थांबवून एका विशिष्ट कर्मात गुंतवायचं कसं, ते पाहू. एकाग्रता आपोआप येत नाही, त्यावरही काम करावं लागतं. मन खूप चंचल असेल, तर एकाग्रतेसाठी प्रयत्न घ्यावे लागतात.

काय करायचं?

बऱ्याचदा आपण आपली ध्येयं स्पष्टपणे निश्चित करत नाही. करायचं काय हे एक्झॅक्टली डिफाइन करत नाही. त्यामुळं प्रयत्न आणि आपली शक्ती खूप संदिग्ध प्रकारे वाहत राहते. म्हणूनच नक्की काय करायचं हे ठरवा. सोपे उदाहरण बघूया - प्रवास करायचा आहे.

कसं करायचं?

काय करायचं हे पक्क केल्यावर ते कसं करायचं हेही निश्चित करा. चाचपडण्यात वेळ व शक्ती वाया जाते. उदाहरणार्थ, मुंबईला जायचं ठरवलं की मग कसं जायचं हे पक्कं करा

किती चांगलं जमतंय?

कायम आपण कोणतीही गोष्ट अजून चांगली व्हावी अशा किमान इच्छेनं तरी करतो. गाडीनं जायचं ठरलं, पण ती नीट चालवता येते का हेही पाहायला पाहिजे. गाडी उत्तम स्थितीमध्ये आहे ना, हेही निघण्यापूर्वीच तपासून पाहावे.

कुठं जायचं?

पुण्याहून मुंबईला जायचं ठरलं, तर रस्ता माहीत हवा. दिसेल त्या दिशेनं जाऊन चालणार नाही. कुठल्याही कर्मात आपण प्रत्यक्ष मार्गावर राहणं अत्यावश्यक आहे. म्हणूनच जसं अधून मधून आपण जीपीएस मॅप पाहत गाडी चालवतो, तसेच निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत जात असताना बरोबर मार्गानं व वेगानं चाललोय ना याकडं दुर्लक्ष होऊ नये. एक जानेवारीला न्यू इअर रेझोल्युशनस् केले असतीलच ना? दर एक-दोन महिन्यांनी ते उघडून ठरलेले वैयक्तिक-व्यावसायिक टप्पे गाठतोय ना, हे पाहायला पाहिजे

अडथळे कोणते?

गाडी चालवताना स्पीडब्रेकर सारखे छोटे अडथळे येतात, तेव्हा वेग कमी करतो. कधी ट्रॅफिक जाम किंवा रस्ता बंदसारखे मोठे अडथळे येतात, तेव्हा ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा मार्ग शोधतो. अडथळा आला म्हणून पुढे जायची योजना रद्द करत नाही. तसंच कर्मात जे अडथळे येतील त्यांना बाजूला कसं सारायचं ते शिका, त्यांच्यावर मात करा पण ठरलेल्या कर्मापासून हटू नका

व्यत्यय कोणते?

प्रचंड व्यत्ययांनी भरलेल्या आजच्या काळात आपलं मन भिरभिरलेलं असणं नैसर्गिक आहे, पण यावरच मात करायची आहे. व्यत्ययांचे आपण गुलाम होता कामा नये. कामाला बसलात, तर फोन सायलेंट करून बाजूला ठेवा. हातातलं काम पूर्ण झाल्याशिवाय मी फोनला हात लावणार नाही, हे मनाला बजावा.

सोशल मीडियाचे सारखे वाजणारे नोटिफिकेशनमुळे आपल्या मेंदूच्या कार्यात खूप असंतुलन निर्माण होत आहे, मेंदूत रासायनिक बिघाड होत चालला आहे. हे सहाही मुद्दे तुमची एकाग्रता वाढवायला आणि कर्मात बुडून जाऊन उत्तम काम, आनंद, समाधान देण्यासाठी मदत करतील.

loading image
go to top