हसण्यासाठी जगा : मनाच्या आडाख्यांचा आखाडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हसण्यासाठी जगा : मनाच्या आडाख्यांचा आखाडा!

हसण्यासाठी जगा : मनाच्या आडाख्यांचा आखाडा!

रेल्वे स्टेशनवर लोकांची वर्दळ होती. एक माणूस भरपूर सामान असलेल्या बॅगा घेऊन प्लॅटफॉर्मवर आला. समोर नवरा-बायकोच्या दोन जोड्या बसल्या होत्या. ते त्याच्याकडे पाहत होते. फावला वेळ भरपूर होता. समोरच्या माणसाच्या हालचालींवरून अंदाज बांधत, त्याच्याबद्दल काय वाटतं ते एकमेकांशी बोलायचा खेळ खेळण्याचं ठरतं. त्यानुसार ते बोलायला लागतात.

पहिला म्हणाला, ‘‘चांगल्या घरातला दिसतो आहे. एवढं सामानाचं ओझं घेऊन स्वतःच फिरतो आहे. म्हणजे त्याला आर्थिक तंगी असावी.’’

खांदे पडलेला दुसरा म्हणाला, ‘‘बसण्यासाठी बाक रिकामा होता, पण तरीही तो खांबापाशी असलेल्या कट्ट्यावर जाऊन बसला आहे. म्हणजे त्याच्यात आत्मविश्‍वासाची कमतरता आहे.’’

पहिल्याची बायको म्हणाली, ‘‘मोबाईलवरती बहुधा बायकोशी बोलतोय.... आणि वर-खाली हातवारे करतोय. बहुधा त्याचं भांडण झालेलं दिसतंय.’’

घाबरटपणे दुसरी बाई म्हणाली, ‘‘...आणि तो बघ रेल्वेच्या ट्रॅकपर्यंत जातोय. रेल्वे येणार त्या दिशेने पाहतोय. हात लांबवून रेल्वेच्या रुळाच्या दिशेने घेतोय. अंतराचं माप घेतल्यासारखा! मला तर वाटतंय... तो रेल्वे आल्यावर आत्महत्या करण्याचा विचार करतोय.’’

‘त्या माणसाला वाचवायला हवं,’ असा विचार करून ते त्याच्या जवळ गेले. ‘निराश होऊ नकोस,’ म्हणून सांगायला लागले. त्या माणसानं विचारलं, ‘‘तुम्ही असं का बोलताय?’’ चौघांनी पाहिलेल्या गोष्टी आणि त्यांच्या मनात आलेला विचार त्याला सांगितला. तो माणूस हसायला लागला. प्रत्येक कृतीमागे प्रत्यक्षात घडलेली घटना आणि त्यामागचा त्याच्या दृष्टिकोन सांगायला लागला.

तो म्हणाला, ‘‘मी परदेशात राहतो. तिथं माझं उत्तम चाललंय. खूप वर्षांनी परत आलो आहे. परदेशात स्वतःचं सामान स्वतःलाच इकडून तिकडून न्यायला लागतं. म्हणून स्वतःच सामान घेऊन फिरत होतो. बाक रिकामा होता. पण जुने कॉलेजचे दिवस आठवले. कट्ट्यावरती बसण्याचा आनंद घेण्यासाठी तिथे बसलो. बायकोशी मोबाईलवर बोलत असताना, माझ्या आजूबाजूला एक माशी घोंगावत होती. त्याचा त्रास कमी करण्यासाठी हात वर-खाली करत होतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात रेल्वेतून खूप प्रवास केला. आज यशस्वी झालो आहे, पण त्यात रेल्वेचे योगदान खूप मोठं आहे. जुने संस्कार शिल्लक आहेत, म्हणून रेल्वे येत असलेल्या दिशेने पाहिलं. हात लांब करून प्लॅटफॉर्म वरूनच रुळांना स्पर्श केल्यासारखं करत नमस्कार केला. जुन्या दिवसांच्या आठवणीसाठी रेल्वेतून प्रवास करणार आहे. उतरल्यानंतर गावातली लोकं स्वागताला येणार आहेत.’’

आपल्या आजूबाजूला अनेक माणसं वावरतात. घरापासून ऑफिसपर्यंत लोक त्यांच्याबाबत आडाखे बांधतात. ‘मला असं वाटतं, माझा समज झाला.’ हे त्यांच्या बोलण्यातून येतं. स्वतःच्या मनातल्या भावभावनांचा परिणाम त्यांच्या दृष्टिकोनावर पडतो. तटस्थपणे विचार न करू शकल्याने अर्थाचा अनर्थ केला जातो. तो चुकीचा अर्थ इतरांना सांगून ते सहकाऱ्यांमध्ये नकळत नकारात्मकता निर्माण करतात.

मनाचे खेळ सुरू असतात. ‘आपल्या मनात आलेले आडाखे आणि समोरच्या माणसाच्या मनातला प्रत्यक्षातला विचार किती जुळतात,’ हे अधून मधून तपासून पाहाणं गरजेचं असतं. आडाख्यांच्या आखाड्यात स्वतः चितपट होणार नाही, याची काळजी घ्या. कारण ‘तुम्हाला वाटणं आणि प्रत्यक्षात असणं,’ यात तफावत निर्माण होणार नाही याची काळजी घेतली तर जगणं सुसह्य होतं!!!

loading image
go to top