शोध स्वतःचा ; लोकांत... एकांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

myfa

शोध स्वतःचा ; लोकांत... एकांत

sakal_logo
By
देवयानी एम.

आपण शाळा-कॉलेजमध्ये असताना खूप सोशल असतो, अनेक मित्र-मैत्रिणी, मोकळेपणाने वागायचो-बोलायचो, आनंदात असायचो. मग मोठे होत जातो आणि हळूहळू आपल्या भोवती आपण छोटं कुंपण बांधायला लागतो. आणखी मोठे होतो मग त्या कुंपणाच्या भिंती होऊ लागतात, आणि भिंतींच्या तटबंदी.. या उभारलेल्या भिंतींमध्ये आपल्याला सुरक्षित वाटू लागतं. पण याचा धोका असा आहे, की या भिंती आपल्याला एकाकी करणाऱ्या असतात. जगापासून, आजूबाजूच्या माणसांपासून दूर करतात.

आणि याचा मोठा फटका बसतो जेव्हा एकटेपणातून विचारांची गर्दी मनात वाढू लागते. ती इतकी वाढत जाते, की आपल्या न कळत, आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाऊन त्यात आपण गुरफटून जातो. जागेपणी आणि झोपेतही या विचारांचा कल्लोळ थांबत नाही. अतिविचार त्यात एकाकी हे कॉम्बिनेशन म्हणजे ब्रेक नसलेली रेसर बाईक चालवण्यासारखं आहे! कितीही लपवला तरी चेहऱ्यावर तो दिसतोच! तुम्हाला कोणी कारण नसताना ‘तू आजारी आहेस का?’ असं विचारलं तर तो धोक्याचा इशारा समजावा.

Isolation is Dangerous

स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी बांधलेल्या या भिंती तुमच्या शक्तीच्या स्रोतांशी संपर्क तोडतात. तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्याबद्दल तुम्ही कान गमावता. सुरक्षित होण्याऐवजी ज्या सामाजिक संदर्भांवर तुमचे जीवन अवलंबून आहे, त्यापासून तुम्ही स्वतःला दूर करता. या भिंती खरंच तुम्हाला मदतीपासून दूर नेतात. किल्ल्यात राहणाऱ्यांना संरक्षण मिळतं, पण आपल्या मनानं बांधलेल्या या किल्ल्यानं समस्याच अधिक निर्माण होतात. त्याचबरोबर एकाकीपणा तुमच्या हावभावांमध्ये, हालचालींमध्ये अस्ताव्यस्तपणा निर्माण करतो आणि व्यक्तिमत्त्व बेडौल दिसू लागतं. लोक तुम्हाला टाळू लागले तर आणखी एकटेपणा निर्माण होतो. मनाचे कोपरे मोठे होत गेले, तर आपण स्वतःला त्याच कोपऱ्यात कधी कैद करून ठेवलं हे कळणार देखील नाही. समाजापासून दूर फेकून दिल्यासारखं वाटू शकेल.

अनिश्चिततेचा काळ माणसाला अंतर्मुख बनवतो, परंतु याच काळात आपण कोशात जाण्याच्या इच्छेशी लढण्याची आवश्यकता आहे. त्याऐवजी जुने मित्र शोधा आणि नवीन बनवा, तुमचे छंद जोपासा, स्वत:ला अधिकाधिक समाजाजवळ घेऊन जा. शतकानुशतके शक्तिशाली लोकांची ही युक्ती आहे. आपल्या भोवती आनंद निर्माण करणारी नाती घट्ट करा. तुम्ही इतरांशी जितके जास्त संपर्क साधता, तितके तुम्ही अधिक मोकळे होऊ लागता.

धोके वेगळे होण्यातील...

धोका असा ही आहे की अशा प्रकारचे समाजापासून वेगळेपण सर्व प्रकारच्या विचित्र आणि विकृत कल्पनांना जन्म देते. आपण बिग पिक्चरचा दृष्टिकोन एकवेळ या काळात मिळवू, परंतु छोट्याछोट्या आनंदांना विसरून बसू. आयुष्य लहानलहान गोष्टींनीच बनतं. तसेच तुम्ही जितके अलिप्त राहता तितके तुम्ही तुमच्या एकांतातून बाहेर पडणं कठीण करून ठेवता. दलदलीत रुतत जाण्यासारखे खोलवर बुडून जातोय ते तुमच्या लक्षातही येणार नाही. जर तुम्हाला मार्ग काढण्यासाठी, विचार करण्यासाठी वेळ हवा असेल, तर फक्त शेवटचा उपाय म्हणून एकाकीपणा निवडा आणि ते ही फक्त लहान डोसमध्ये. समाजात परत येण्याचा मार्ग मोकळा ठेवताय याची काळजी घ्या!

निरोगी एकांत आपल्या आंतरिक प्रगतीला पूरक ठरेल, पण अतिरेकी एकांत आपल्या नकळत मानसिक अनारोग्य निर्माण करेल. यामुळं आपण माणूसघाणे होऊ शकतो. सर्व भावभावना आत दबल्या जाऊन घुसमट होत राहील. त्यापेक्षा जसे समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, ‘काही काळ लोकांत.. काही काळ निवळ.’ असे संतांनी सांगितलेलं तत्त्व स्वीकारणं योग्य होईल. निसर्गातील खळाळता झरा व शांत डोह दोन्हींचे आपापले सौंदर्य आहेच की!

loading image
go to top