शोध स्वतःचा : स्वतःपलीकडे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शोध स्वतःचा : स्वतःपलीकडे...

शोध स्वतःचा : स्वतःपलीकडे...

विल्यम शेक्सपियरनं म्हटले आहे, ‘All the world''s a stage. And all the men and women merely players. They have their exits and their entrances...’

आयुष्य स्टेजवरच्या नाटकासारखं असतं. आपल्यापैकी प्रत्येकाला दिलेलं काम चोख झालं, वेळच्यावेळी झालं, आपल्याला दिलेली स्क्रिप्ट-त्यातला प्रत्येक शब्द पूर्ण निष्ठेनं वापरला तरंच नाटक जमून येतं. स्टेजवरचं आपलं वावरणं, हावभाव, हालचाली, सहकलाकारांशी परस्पर संवाद, त्यात दिलेली एकमेकांना साथ यातलं काहीच नजरेआड होत नाही. सहकलाकार प्रत्यक्षात माणूस म्हणून आपल्या आवडीचा असो वा नसो त्या सर्वांना आपण स्टेजवर कशी वागणूक देतो हे महत्त्वाचं ठरतं.

याप्रमाणेच रोज जगताना आपली कर्म, आपलं बोलणं, इतरांना दिलेली वागणूक, आपलं वर्तन, इतरांशी असलेले संबंध या सर्वांचं महत्त्व असतं. श्रीमद् भगवद्गीतेत म्हटलं आहे, ''योग: कर्मसु कौशलम्''. कोणतेही कर्म ग्रेसफुली केलेलं असेल, म्हणजे जागरुकतेनं केलेलं असेल तर ते उत्तम कर्माकडं जाऊ लागतं. अशोभनीय असं काही आपल्याकडून होऊ नये याची काळजी घ्यावी. आपल्याकडं लोक बघत असताना चांगलं वागण्यात काहीच कौशल्य नाही, परंतु कोणीही बघत नसताना आपण कसं वागतो आणि आपली नीती-मूल्यं सर्वोत्तम रीतीनं कशी पाळतो याला म्हणतात ‘चारित्र्य’. हे सर्व सहजतेनं ‘way of life’ म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाला पाहिजे. पण मुळातच जाणीवा प्रगल्भ असलेल्या व्यक्ती विकासाच्या मार्गावरच असतील. त्यांना फार कष्ट न घेता हे साध्य करता येईल.

असं म्हणतात ''Actor should never be larger than the film''. तसंच आयुष्याचं ध्येय काय, आपली उद्दिष्टे काय, मानवी क्षमतांना उंचावण्यासाठी काय करावे, आपण किती जणांच्या उपयोगी पडू शकतो हे सर्व बाजूला ठेवून आपला अहंकार, आपल्या कामना-वासना, स्वार्थ जेव्हा मोठे होऊन बसतात, तेव्हा आयुष्याचा समतोल बिघडतो. आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट गोष्टींचा, प्रसंगांचा प्रामाणिक लेखाजोखा मांडला तर आपल्याला मिळालेलं आयुष्य आपण कसं जगलो याचं खरं उत्तर मिळेल. पारदर्शकतेने पाहता मात्र आलं पाहिजे. भारतात किंवा जगात ज्यांनी ज्यांनी मोठी कामगिरी करून दाखवली त्यांनी स्वतःच्या स्वार्थाच्या, गरजांच्या आणि अस्तित्वाच्या पलीकडं जाऊन विचार केला म्हणून नवनिर्मिती करू शकले. यासाठी तुम्ही असामान्य असण्याची, मोठ्या घराण्यात जन्म घ्यायची गरज नाही. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे पुरस्कार सोहळ्यानंतर घरी जाताना पुरस्कार गाडीतच विसरल्या. ‘येईल नंतर..’ असं सहज म्हणून गेल्या, तेव्हा मानसन्मानापेक्षा कर्मावर असलेली त्यांची निष्ठा दिसून येते.

आपण जितका काळ जगू त्याचे सार काढले तर काय गमावलं, काय कमावलं, काय उरलं, किती समाधानी आहोत याचा विचार मनाच्या एका कोपऱ्यात कायम असावा. नाटकात स्टेजवर एक कलाकार नीट काम करत नसेल, तर दुसऱ्या कलाकाराला सगळ्यांना सांभाळून पुढं जाण्याचा ताण पडतो, तसं आपलं नसावं. आपलं अस्तित्व हलकं म्हणजेच आपल्या आजूबाजूच्यांच्या अंगावर येऊ नये, आपला भार पडू नये. तरंच ते आल्हाददायक होईल. बहुतांश चित्रपटात शेवटी सगळं छान होतं, तसं जीवनाचा शेवट छान नोटवर व्हावा असं वाटत असल्यास संपूर्ण जीवनच त्या पद्धतीनं जगावं लागतं!

Web Title: Search Yourself Beyond Yourself Writes Devyani M

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top