चेतना तरंग : वैराग्य आणि त्याचे प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar

चेतना तरंग : वैराग्य आणि त्याचे प्रकार

जगातील दुःखे आणि दुर्दशा पाहिल्याने आणि त्याबद्दल भीती वाटू लागल्याने येणारे वैराग्य हे पहिल्या प्रकारचे वैराग्य होय. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या अथवा भोवतालच्या जीवनांमध्ये पाहिलेल्या दुःखद आणि यातनामय घटनांमुळे असे वैराग्य येते.

आपल्या जीवनामध्ये नित्य दिनक्रमापेक्षा अधिक, काहीतरी उच्च मिळवण्याच्या हेतूने आपण वैराग्याचा स्वीकार करतो, ते दुसऱ्या प्रकारचे वैराग्य होय. काहीजण वैराग्याला आत्मबोधाचा आणि मुक्तीचा मार्ग मानतात. आता काही गोष्टींचा त्याग केल्याने पुढे काहीतरी दिव्य प्राप्त होईल अशी त्यामागची अपेक्षा वा धारणा असते. स्वर्गामध्ये, अढळ, चांगली जागा मिळावी म्हणून हे लोक शपथा घेतात आणि अनेक पथ्ये पाळतात.

तिसऱ्या प्रकारचे वैराग्य हे ज्ञानामधून येते. ज्ञानोपासना केल्यावर सृष्टीतील सर्व गोष्टींची क्षणभंगुरता, अस्थायी स्वरूप यांची जाणीव झाल्यावर घटना, वस्तू, लोक आणि परिस्थिती या साऱ्यांपासून अलिप्त आणि निरिच्छ राहणे शक्य होऊ लागते आणि त्यामुळे असा साधक शांतचित्त आणि अविचल असतो. ईश्वरावरील भक्ती अथवा प्रेम मात्र वैराग्याचा आविष्कार घडूच देत नाही! असे दैवी प्रेम प्राप्त झाल्यावर जो परमानंद आणि जी धुंद नशा लाभते, त्यांच्या आवेगात सर्व उत्कट भावना तर वाहून जातातच, पण वैराग्यदेखील वाहून जाते!

विश्वास आणि सावधपणा

विश्वास आणि सावधपणा पूर्णपणे एकमेकास विरोधाभासी असल्याचे भासते. जेव्हा तुम्ही खूप सावध असाल, तेव्हा बहुधा कशावरही विश्वास राहिलेला नसतो आणि तुम्हाला खूप असुरक्षित आणि अस्वस्थ वाटत असते. जेव्हा तुम्हाला पूर्ण विश्वास असतो तेव्हा मनात सुरक्षिततेची भावना असते आणि तुम्ही स्वस्थ व बेसावध असता. तुम्हाला सावध राहण्याची गरज भासत नाही.

विश्वास तीन प्रकारचे असतात...

  • तामसिक विश्वास हा आपल्या सुस्तपणामुळे येतो. एक उदाहरण देतो. जेव्हा तुम्हाला कोणतीही जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही आणि काहीही कृती करायची नसते, तेव्हा केवळ आळसामुळे तुमचा पर्याय असतो, ‘ओह, काही काळजी करायची गरज नाही. या गोष्टींची ईश्वर निश्चित काळजी घेईल!’

  • राजसिक विश्वास आपल्यामध्ये अतिशय तीव्र इच्छा व महत्त्वाकांक्षा असताना केवळ त्यांच्यासाठीच निर्माण होतो. तुमच्या महत्त्वाकांक्षा तुमचा विश्वास जिवंत ठेवतात.

  • सात्त्विक विश्वास निरागस असतो आणि आपल्या चेतनेच्या परिपूर्णतेतून निर्माण झालेला असतो.

विश्वास आणि सावधपणा हे जरी विरोधाभासी वाटत असले, तरी ते तसे नसून एकमेकास पूरक आहेत. विश्वास अथवा श्रद्धेच्या अभावी मानवाचा विकास अशक्य आहे. सावधपणा नसल्यास कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजावून घेतली जात नाही. विश्वासामुळे तुम्ही बेसावध होऊ शकाल, तर केवळ सावधपणामुळे तुम्ही तणावपूर्ण व्हाल. विश्वास नसेल, तिथे भय असते. जेव्हा सावधपणा नसेल, तेव्हा योग्य दृष्टिकोनातून अनुभव घेता येत नाही आणि त्याचे स्पष्टीकरणही देता येत नाही. म्हणून विश्वास आणि सावधपणा हे दोन्हीही एकत्र असणे चांगले आहे आणि आवश्यकही आहे.

Web Title: Shri Shri Ravishankar Writes About Wave Of Consciousness Abstinence And Its Forms

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Life
go to top