
जिंकण्याचा ‘हार’ ; हारण्यातून जिंकणं!’
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू असतो. प्रमुख पाहुणे बोलायला उभे राहतात. ‘कोण जिंकलं, कोण हारलं याहीपेक्षा तुमचा सहभाग जास्त महत्त्वाचा आहे. सहभागी होत राहा. तुम्हाला यश नक्की मिळेल.’ टाळ्यांचा कडकडाट होतो. विजेत्यांना बक्षिसं मिळतात, तर इतरांना उमेद मिळते. जिंकण्याचा आनंद मोठा असतो. त्यासोबत ‘मान’ही मिळतो आणि काही वेळा ‘धन’ही मिळतं. काही लोकांच्या बाबतीत जिंकण्याची ही प्रबळ इच्छा, स्पर्धेव्यतिरिक्त आयुष्याचादेखील अविभाज्य भाग होते. प्रत्येक क्षणी जिंकण्याचा मोठा ताण घेऊन ते जगत असतात. पण आयुष्यात काही वेळा जिंकण्यापेक्षा, हारणं जास्त मौल्यवान ठरतं!
चार, पाच वर्षांचं लहान मूल बरोबर घेऊन लोक बगीचात जातात. तिथल्या खेळकर वातावरणात लहान मूल आणि वडील यांची पळण्याची स्पर्धा ठरते. दोघे शेजारी उभे राहतात. आई लांब उभी राहून ‘स्टार्ट’ ओरडते. दोघं पळायला लागतात. जोरात पळून जिंकणं वडिलांना सहज शक्य असतं. पण वडील जोरात पळण्याचा अभिनय करत, हळूहळू पळतात. लहान मूल पळत पुढे जातं. आईच्या हाताला पळत जाऊन स्पर्श करतं. वडिलांना हरवून जिंकल्याचा आनंद त्याला होतो. ते नाचत नाचत आजी-आजोबांना ही गोष्ट सांगतं. क्रिकेट, फुटबॉल, कुस्ती अशा लुटूपुटूच्या खेळात पालक सुरुवातीला जाणूनबुजून लहान मुलांबरोबर हारतात. त्यांच्या हारण्यातून लहान मुलांना जिंकण्याची प्रेरणा मिळते. आनंद मिळतो. त्यांचा नवा पाया रचला जातो.
नवरा-बायकोमध्ये तात्त्विक वाद होतात. प्रत्येक जण हिरिरीने ‘आपलंच कसं बरोबर आहे,’ हे मांडत राहतो. वाद वाढला की फुरंगटणं होतं. अबोला तयार होतो. ‘यापुढं जगाच्या अंतापर्यंत हे एकमेकांशी बोलणार नाहीत की काय?’ अशी भीती घरातल्या आजूबाजूच्या लोकांना वाटायला लागते. वाद झाला असला, तरी एकमेकांबद्दल असणारी आपुलकी, प्रेमाची भावना श्रेष्ठ ठरते. दोघातला एक जण हळूच माघार घेतो. त्याच्या हारण्यातून प्रेमाचं नातं मात्र जिंकतं.
ऑफिसमध्ये टेंडर भरण्याची प्रक्रिया सुरू असते. साहेबांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार सगळे जण काम करत असतात. त्यात एक त्रुटी राहिलेली असते. ‘पण साहेबांना कोण बोलणार?’ म्हणून सगळे जण गप्प बसतात. नवीन आलेला एक जण हिय्या करून साहेबांपुढं विषय मांडतो. अशावेळी हुशार साहेब, ‘माझंच बरोबर आहे,’ असं म्हणत त्याच्यावर चिडत नाही, तर ‘तुझं कसं बरोबर आहे हे समजावून सांग,’ असं शांतपणे सांगतो. ती व्यक्ती सर्व गोष्टी समजावून सांगते. ‘त्रुटी काढून नवा बदल केला तर टेंडर मिळण्याची संधी वाढेल,’ हे निदर्शनास आणते. साहेब खुलेपणाने चूक स्वीकारतात. ऑफिसच्या कर्मचाऱ्याचं कौतुक करतात. यामुळं इतर कर्मचाऱ्यांना ‘आपण साहेबांशी मोकळेपणाने बोलू शकतो,’ हा आत्मविश्वास मिळतो. साहेब क्षणभर हारतात पण त्यातूनच कंपनीच्या यशाची कमान बांधली जाते.
स्पर्धेतलं यश हे बऱ्याचदा जिंकणं किंवा हारणं या एकाच मापदंडा वरून पाहिलं जातं. मात्र आयुष्यात यशाचे अनेक पैलू असतात. म्हणूनच काही वेळेला आयुष्यात हारण्यामुळे प्रेरणा मिळते, सकारात्मकता निर्माण होते, नात्यांमध्ये उमेद निर्माण होते. जिंकण्यासाठी गळ्यात ‘हार’ घातला जाणं स्वाभाविक आहे. पण जगण्याच्या स्पर्धेत ‘हार’ण्यातून जिंकणारे जास्त बुद्धिमान असतात!!!
Web Title: The Defeat Of Winning Is The Victory Of Losing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..