esakal | हसण्यासाठी जगा : थकलेल्या मनाला, देऊया उभारी!
sakal

बोलून बातमी शोधा

हसण्यासाठी जगा : थकलेल्या मनाला, देऊया उभारी!

हसण्यासाठी जगा : थकलेल्या मनाला, देऊया उभारी!

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

माणसांना अनेक  गरजा आहेत.  माणसांना अनेक  ध्येयं असतात. ऑफिस,  नातेवाईक,  मित्रमंडळी अशा अनेकांशी आपला दिवसभर संपर्क होत असतो. त्यात सोशल मीडियाचे अनेक प्रकार वापरले जातात. यामुळं मनामध्ये सुद्धा अनेक विचार असतात. त्यामुळं ताणतणाव निर्माण होतात. ‘हे काम करू’ की ‘ते काम करू’ अशा विचारात मन भरकटतं.  हातून काम होत नाही. कामं अपूर्ण राहिली की ताण वाढतो. यामधून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.

  • दिवसभरात  करायची सर्वच कामं महत्त्वाची वाटतात. त्यातल्या त्यात सोपी कामं लवकर केली जातात. कामाचा वेळ त्यातच वापरला  जातो. या गडबडीत अती महत्त्वाची कामं तशीच राहतात.  मग लोक म्हणतात, ‘माझ्या हातातली कामं संपतच नाहीत.’  क्रिकेटमध्ये मुख्य फलंदाज बाद केला, की राहिलेली टीम लवकर बाद होते. दररोज सकाळी महत्त्वाच्या कोणत्या ‘कामाला बाद’ करायचं याचा विचार करून  दिवसाच्या खेळाला सुरुवात करा.

  • फुटबॉलच्या मैदानावर अनेक खेळाडू असतात. तसंच मनामध्ये अनेक विचार असतात. ज्या विचारांवर तुमच्या मनाचं लक्ष जातं, त्याला ‘कामाचा बॉल’ मिळतो.  ‘बॉल’ असलेल्या खेळाडूला अडवण्याचं काम इतरजण करत असतात.  तसंच तुम्ही करत  असलेल्या कामावरील लक्ष अडविण्यासाठी विचार मनात येत राहतात.  त्यांना  चुकवून तुम्हाला पुढं जायचं असतं. हातातलं काम पूर्ण झालं तर ‘गोल’ मारल्याचा आनंद  मिळतो.

  • मनाच्या रचनेत एका वेळेला आपण एकच काम करू शकतो.  त्यामुळं काम करताना अचानक दुसरा विचार आल्यास तो एका वेगळ्या कागदावर नोंदवून ठेवा.  हे करताना त्यात कोणत्याही प्रकाराने गुंतू नका.  ‘थोड्या वेळानं हे काम करायचं आहे,’ असं आपल्या मनाला सांगून हातातल्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करा. असं केल्यानं मनाच्या एकाग्रतेची क्षमता वाढते.

  • काही लोक एकावेळी अनेक कामं करताना दिसतात.  त्याला ‘मल्टिटास्किंग’ म्हणतात.  प्रत्यक्षात ते एका वेळेला एकच काम करत असतात,  मात्र एका कामाचं बटन बंद करून दुसऱ्या कामाचं  बटन दाबून सुरू करण्याचा त्यांचा वेग इतरांपेक्षा प्रचंड असतो. अर्थात, सतत ‘स्वीच ऑफ स्वीच ऑन’ केल्यामुळं मनावरचा ताण अधिक वाढतो. दिव्याचं बटण  सतत चालू बंद केलं, तर काही काळानं  बटन नादुरुस्त होतं.  तसंच क्षणाक्षणाला स्वतःचं काम चालू बंद  केल्यास लोकांना मानसिक त्रास होतो.

  • अनेक गोष्टी आपण सवयीनं करतो.  ज्या गोष्टी आपण सवयीनं करतो, तिथं मनाची गुंतवणूक कमीत कमी असते. यासाठी नियमित कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा  अभ्यास करून त्यातील जास्तीत जास्त गोष्टींचं सवयीत रूपांतर केलं, तर महत्त्वाचं काम करण्यासाठी मनाचं लक्ष केंद्रित करता येतं.

  • ‘काम पूर्ण करणं म्हणजे शिक्षा आहे,’ अशा वृत्तीनं काम केल्यास मनाची साथ मिळत नाही.  या ऐवजी ‘काम पूर्ण करण्यात आनंद आहे,’ असं वारंवार स्वतःला स्वयंसूचना देत राहिल्यास काम करण्याची गती वाढते.

जगताना काही कामं शारीरिक  श्रमाची असतात, तर काही मानसिक श्रमाची. शरीर दमलं, तर झोप शांत लागते, मन थकलं तर झोप उडते. एकावेळी लक्षपूर्वक एकच गोष्ट पूर्ण केल्यास मनाचं थकणं कमी होतं आणि काम करण्याची उभारी मिळते!

loading image
go to top