esakal | महर्षी पतंजली आणि योग सूत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

महर्षी पतंजली आणि योग सूत्र

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

महर्षी पतंजली यांनी इसवी सन २०० ते ५०० दरम्यान योग सूत्रे लिहिली आहेत. यातून त्यांनी योग जीवनाची मूलभूत सूत्रे सांगितली आहेत. त्यामुळेच त्यांना योगाचे ‘पितामह’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय त्यांनी आद्य व्याकरणकार पाणिनी यांच्या कार्यावर व संस्कृत व्याकरणावर आधारित ‘महाभाष्य’ नावाचा ग्रंथही लिहिला आहे. आयुर्वेदावरही त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी मनाच्या प्रसन्नते आणि पावित्र्यासाठी योगाची दीक्षा आपणा सर्वांनी दिली आहे. त्यातून आरोग्यासाठी उत्तम औषध आणि बोलण्यातील शुद्धतेचे व्याकरणही समजावून सांगितले आहे.

पंतजली यांचा आत्मा सामान्य नव्हता. ते भगवान विष्णूचे आसन असलेल्या आधिशेषाचे, म्हणजे एक हजार मस्तक असलेल्या नागाचे अवतार होते. एके दिवस विष्णू भगवान भगवान शंकरांच्या तांडव नृत्याचा आविष्कार पाहत होते. त्यावेळी भगवान विष्णूंचे शरीर कंप पावू लागले आणि ब्रह्मानंदाने जड होऊ लागले. तासभर चाललेल्या तांडव नृत्यामुळे भगवान विष्णूंचे शरीर इतके जड झाले, की आधिशेषाचा श्वास गुदमरायला लागला. भगवान शंकरांचे नृत्य पाहत असताना भगवान विष्णूंना होत असलेला ब्रह्मानंद आणि अन्य वेळी त्यांच्यात असलेल्या स्थिरतेची अनुभूती आधिशेषाला जाणवली.

मानवी रूप धारण करण्याचे तंत्र भगवान शंकरांकडून शिकण्याची आधिशेषाची इच्छा होती. भगवान शंकराने आपल्यावर प्रसन्न व्हावे अशी इच्छा आधिशेषाने भगवान विष्णूंकडे व्यक्त केली. भगवान विष्णूंनी त्याला प्रसन्न होऊन आशीर्वादही दिला. व्याकरणावरील भाष्य करणारे लेखन करण्यासाठी त्याचबरोबर नृत्यकलेत पूर्णत्वासाठी भगवान शंकर तुला प्रोत्साहित करतील, असे भाकितही भगवान विष्णूंनी आशीर्वाद देताना केले. यासाठी त्याने पृथ्वीवर योग्य मातृत्व शोधण्यासाठी ध्यानधारणा करण्यास सुरवात केली. ती करत असताना गोनिका नावाची योगिनी त्याच्या दृष्टिक्षेपात आली. आपले ज्ञान आणि शहाणपणा देऊ शकेल असा पुत्र पोटी जन्माला यावा, अशी प्रार्थना ती करत होती. एके दिवशी गोनिका नित्यनियमानुसार सूर्य देवाची प्रार्थना करत होती. सूर्यदेवाचे ध्यान करताना ओंजळीत शिल्लक पाण्याचे मनोभावे अर्ध्य देण्यापूर्वी तिने डोळे उघडून तळव्यांकडे पाहिले. तिला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. तिच्या तळव्यावर लहानसा नाग होता आणि त्याने काही काळातच त्याने मानवी रूप धारण केले. त्या लहानग्याने गोनिकाला साष्टांग दंडवत घातले आणि मुलगा म्हणून माझा स्वीकार करा, अशी विनंती केली. तिने विनंती मान्य करत त्याचा स्वीकार करून पतंजली नाव ठेवले. पत म्हणजे पडणे आणि अंजली म्हणजे अर्पण किंवा प्रार्थनेसाठी जोडलेली ओंजळ. आहे की नाही मनोरंजक?

भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार त्यांनी कार्य हाती घेतले. त्यांनी संस्कृत व्याकरणावर भाष्य करणाऱ्या ‘महाभाष्य’ ग्रंथाचे लेखन केले. भाषा शुद्धीकरणासाठी केलेले ते अभूतपूर्व कार्य ठरले. यानंतर जीवनाचे आणि आरोग्याचे शास्त्र सांगणाऱ्या आयुर्वेद ग्रंथाचेही त्यांनी लेखन केले. मानवाच्या आध्यात्मिक आणि मानसिक विकासासाठी त्यांनी ‘योग दर्शना’वर कार्य केले. जीवन कसे जगावे, यासाठी त्यांनी १९६ योग सूत्रांचे लेखन केले. भारतातील सर्वच शास्त्रीय नृत्य कलाकार पतंजलींना महान नृत्यांगना म्हणून वंदन करतात. एकत्रितपणे विचार केल्यास त्यांचे कार्य विचार, बोलणे आणि कृतीशी संबंधित आहे. आपले विचार, बोलणे आणि कृती योग्य आहे की नाही हे दाखविणारा योगा हा आरसा आहे. त्यात डोकावल्यामुळे स्वतःला सुधारण्याची संधी मिळते. आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी कोणती योगसूत्रे आहेत, याची माहिती आपण पुढील लेखांपासून घेऊयात.

loading image
go to top