इनर इंजिनिअरिंग : मुलांना शिस्त लावण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : मुलांना शिस्त लावण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

मुळात, इंग्रजीमधील डिसिप्लीन (शिस्त) शब्दाचा अर्थ ‘एक शिकवण’ किंवा ‘शिकणे’ असा आहे. तुम्ही ‘मी शिस्तबद्ध आहे,’ असे म्हणता याचा अर्थ असा की, तुम्ही नेहमीच शिकण्यासाठी इच्छुक आहात. तुम्ही कोणत्याही प्रकारे अडकलेले नाही आहात. शिस्त म्हणजे एखादी गोष्ट फक्त विशिष्ट पद्धतीने करणे असे नाही. तुम्ही निरंतर प्रयत्न करत असाल आणि सर्व काही आणखी चांगल्या पद्धतीने कसे करायचे, हे शिकण्यासाठी इच्छुक असाल, तर तुम्ही शिस्तबद्ध आहात. तुम्ही जबरदस्ती करून कुणाला शिकवू शकत नाही. परंतु तुम्ही काही विशिष्ट गोष्टी करण्यासाठी लोकांना भाग पाडू शकता. तरीही, तुम्ही सक्ती फार थोड्या वेळेसाठी करू शकता. दीर्घकाळासाठी, तुमचे जीवन त्याची अंमलबजावणी करण्यातच जाईल आणि त्यांचे जीवन ते चुकवण्याचा प्रयत्न करण्यात जाईल.

माझ्या लहानपणी माझ्या कुटुंबाने माझ्यावर जे काही लादण्याचा प्रयत्न केला, ते काम मी कधीच केले नाही. मात्र जे काही एक संस्कृती म्हणून कुटुंबात अमलात आणले होते, तेच काम करून गेले आणि त्याचा मला अनेक पद्धतीने प्रचंड उपयोग झाला. त्या अगदी सोप्या गोष्टी होत्या. उदाहरणार्थ- आम्ही जिथे कुठे असू, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही नेहमी घरी जायचो. एखादी व्यक्ती आली नसेल, तर संपूर्ण कुटुंब वाट पाहत थांबून राहायचे, म्हणून तुम्ही वेळेवर घरी ‘न जाणे’ होऊच शकले नाही. ही काही एक जबरदस्ती नव्हती. एक असे वातावरण निर्माण केले होते, ज्याचा तुम्हाला भाग व्हावेच लागायचे.

याच त्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, ज्या प्रभावी ठरल्या. तुम्ही सकाळी अंथरुणातून कसे उठता आणि तुमचा कॉफीचा कप तुम्ही कुठे सोडता, यांसारख्या साध्या सोप्या गोष्टी. आम्ही या गोष्टी केल्या नाही, तरी कुणीच आमच्यावर कधीच ओरडले नाही. परंतु माझी आई मग तिथे बसून ते करायची. घरामध्ये काहीही होऊ द्या... माझी आई घरात दोनदा झाडू मारायची. सकाळी आणि संध्याकाळी आणि अगदी मोलकरीण आली नसली, तरी एकदा घर पुसून घ्यायची. केवळ मोलकरीणच ते करत असली असती आणि ती नसताना माझ्या आईने ते काम केले नसते, तर आम्हालाही ते करण्याचा कधी विचारसुद्धा आला नसता, कारण ते मोलकरीण बाईचं काम आहे, असे आम्हाला वाटले असते. परंतु माझी आई ते काम कोणताही संकोच न करता करायची आणि तुम्ही तिला ते करताना पाहिले की तुम्हालाही त्यात पडून ते स्वतः करावे लागायचे.

सभ्यतेचा प्रसार पाठ्यपुस्तकांच्या किंवा उपदेशांच्या माध्यमातून झालेला नाही. ते मुळात कुटुंबांच्या जगण्याचा मार्ग आहे. सर्वकाही, तुम्ही बाथरूममधून कसे बाहेर येता त्यापासून ते तुम्ही तुमच्या टेबलवरून कसे उठता इथपर्यंत. या गोष्टींची तशी घडीच बसली होती आणि त्या पद्धतीनेच त्या घडायला हव्या होत्या. मग तुम्ही त्यात सहभागी व्हा किंवा होऊ नका, कुणीच तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही, पण किती वेळ तुम्ही फक्त सहभाग न घेता राहू शकणार? तुम्ही राहू शकत नाही. जेव्हा प्रत्येक जण ते करत असतो, तेव्हा तुम्हीसुद्धा त्याचा एक भाग होता आणि ते करू लागता.

loading image
go to top