
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ( करीदिनी ) भाजी- भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा भागातून हजारो भाविक येथे येतात. पण यावर्षी मंदिर परिसरातील चित्र मात्र अगदी वेगळे होते
तामसा ( जिल्हा नांदेड ) : तामसा येथील बारालिंग मंदिराची आगळी- वेगळी भाजी- भाकरीची पंगत यावर्षी कोरोना संकटामुळे रद्द झाल्याने शुक्रवारी (ता. १५) मंदिरात भाजी- भाकरी प्रसाद करुन केवळ पंगतीची औपचारिकता पाळण्यात आली. शुक्रवारी मंदिर परिसर भाविकांना भावी निर्मनुष्य होता.
मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ( करीदिनी ) भाजी- भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा भागातून हजारो भाविक येथे येतात. पण यावर्षी मंदिर परिसरातील चित्र मात्र अगदी वेगळे होते. बारालिंग देवस्थानकडून भाजी- भाकरी पंगत रद्द करुन भाविकांना येथे दर्शन व प्रसादासाठी न येण्याचे आवाहन केले होते. भाविकांनी संस्थानाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. शुक्रवारी सकाळी ' श्री ' ला मोजक्या विश्वस्तांच्या उपस्थितीत अभिषेक झाला. दुपारी आरती मंदिराचे पुजारी रेवणसिद्ध महाराज यांच्याहस्ते झाल्यानंतर भाजी-भाकरीचा श्रीला नैवेद्य दाखविण्यात आला.
हेही वाचा - मार्गदर्शन सेवा केंद्राच्या माध्यमातून पीडित ग्राहकांना न्याय मिळवून देणार- डॉ. विजय लाड
यावेळी केवळ विस किलोची भाजी व घरुन बनवून झालेल्या मोजक्या भाकरीचे वाटप औपचारिकता म्हणून करण्यात आले. दरवर्षी येथे अंदाजे दोन क्विंटलची भाजी व शंभर क्विंटलच्या भाकरीचा प्रसाद भाजी- भाकरी पंगतीनिमित्त होत असतो. या निमित्ताने येथे मंदिराचा गाभा विविध फुलांनी आकर्षकरीत्या सजविण्यात आला होता. गर्दी अभावी मंदिर परिसरात शुकशुकाट होता. पंगत रद्द झाल्यामुळे पोलिस यंत्रणेवर ताण नव्हता. मंदिरात दिवसभरात शहरातील भाविकांची तुरळक उपस्थिती होती.
यावेळी बारालिंग देवस्थानचे अध्यक्ष संतोष निलावार, कोषाध्यक्ष अनंतराव भोपळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड, पंडित पाटील, विजयकुमार लाभसेटवार, गंगाधरराव लगडूतकर, रामदास अग्रवाल, विश्वंभर परभणकर, श्रीपाद लाभसेटवार, रविकुमार बंडेवार, दीपक देशमुख, बाळू कंठाळे, ज्ञानेश्वर विभुते आदी विश्वस्त उपस्थित होते.
संपादन - प्रल्हाद कांबळे