कृषिपंप वीजजोडणी धडाक्यात सुरु; नांदेड परिमंडळात २४४ नवीन वीजजोडण्या

प्रल्हाद कांबळे
Friday, 29 January 2021

तर नांदेड परिमंडळात २४४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. 

नांदेड : राज्यात ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी धडाक्यात सुरु झाली आहे. लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० ते ६०० मीटरपर्यंत अंतर असलेल्या सात हजार ८४ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या गुरुवार ( ता. २८) पर्यंत राज्यभरात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तर नांदेड परिमंडळात २४४ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. 

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहेत. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. कृषिपंप वीजजोडणी धोरण राबविण्यासाठी सुरू करण्यात आल्याच्या आठ दिवसात  लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या ६,६९८, २०० मीटरपर्यंत  अंतर असलेल्या ३२४, ६०० मीटरपर्यंत अंतर असलेल्या ५७ तर ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ५ अशा एकूण ७ हजार ८४ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या अहेत.

हेही वाचा - किती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा धम्म आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो

गेल्या पंधरवड्यापासून वीजखांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना प्राप्त झालेल्या किंवा प्रलंबित असलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून नियमाप्रमाणे मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात वीजजोडणी देण्यास देखील प्रारंभ करण्यात आला. आतापर्यंत राज्यात एकूण सात हजार ८४ कृषिपंपांच्या वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात पुणे प्रादेशिक विभागात (कंसात परिमंडल) सर्वाधिक ३, ७७१ (बारामती– १, ७४१, कोल्हापूर– १,५३७ व पुणे ग्रामीण मंडल - ४९३) कृषिपंपांना जलदगतीने वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यानंतर नागपूर प्रादेशिक विभागात – १, ५०८ (अकोला- २२८, अमरावती- ४५९, चंद्रपूर- १६२, गोंदिया- १५२, नागपूर - ५०७), कोकण प्रादेशिक विभागात १, ४३३ (नाशिक- १, ०७२, कोकण- ६, कल्याण- ४०, जळगाव- ३०० व पेण मंडल- १५) आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात ३७२ (औरंगाबाद- १८, लातूर- ११०, नांदेड- २४४) वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

राज्यात ता. १ एप्रिल २०१८ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत राज्यात प्रथमच कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. या धोरणा अंतर्गत राज्यात महा कृषी ऊर्जा अभियानाला बुधवारी (दि. २६) सुरवात झाली आहे व अंमलबजावणीसाठी महावितरणने महा कृषी अभियान ॲप, एसीएफ ॲप,  सौर ऊर्जा लॅण्ड बँक पोर्टल, महा कृषी अभियान धोरण २०२० पोर्टल आदींची निर्मिती केली आहे.

या अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यत उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS)द्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीतजास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.

                        
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 244 new power connections in Nanded circuit nanded news