esakal | नांदेड रेल्वे विभागात ६५व्या रेल्वे सप्ताहात २५९ कर्मचाऱ्यांचा सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ नांदेड विभाग यांच्या हस्ते 259 कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देवून गौरव

नांदेड रेल्वे विभागात ६५व्या रेल्वे सप्ताहात २५९ कर्मचाऱ्यांचा सन्मान

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : 167 वर्षापूर्वी ता. 16 एप्रिल 1853 ला भारतात पहिल्यांदाच मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाच्या स्मरणात भारतीय रेल्वे दर वर्षी रेल्वे सप्ताह साजरा करत असते. यात रेल्वे सेवेत वर्षभर उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. कोविड-19 च्या प्रभावामुळे या वर्षीचा रेल्वे साप्ताहचा कार्यक्रम एप्रिल महिन्यात साजरा होऊ शकला नाही. 

नांदेड विभागीय  रेल्वे कार्यालयात 65 वा रेल्वे साप्ताह पुरस्कार सोहळा (डी. आर. एम. अवार्ड) सोमवारी (ता. 8 फेब्रुवारी)  रोजी साजरा करण्यात आला. कोविड-19 च्या प्रभावामुळे या वर्षी विडीयो कॉन्फेरेन्सिंगद्वारे पुरस्कार वितरण करण्यात आले. यात मुख्य कार्यक्रम नांदेड विभागीय कार्यालयात साजरा झाला. पूर्णा, औरंगाबाद, अकोला येथे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी डी. आर. एम. पुरस्काराचे वितरण केले. 

नांदेड विभागात यावर्षी 110 व्यक्तिगत आणि 23 सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. 23 सांघिक पुरस्कारामध्ये 126  कर्मचाऱ्यांना रेल्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अप्पर विभागीय रेल्वे प्रबंधक नागभूषण राव, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जय शंकर चौहान आणि इतर रेल्वे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. 

नांदेड विभागाने दक्षिण मध्य रेल्वेमध्ये क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. यावर्षी नांदेड रेल्वे विभागाला तीन शिल्ड (ढाल)  मिळाल्या आहेत. ज्यात उत्कृष्ठ रेल्वे पटरी (बेस्ट ट्रेक), उत्कृष्ठ सुरक्षा (सेफ्टी) आणि नवकल्पना (इनोवेशंस) या तीन शिल्ड शामिल आहेत.  याकरिता उपिंदरसिंघ यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपिंदर सिंघ यांनी आपल्या भाषणात वर्ष 2019- 20  दरम्यान नांदेड विभागाने केलेल्या कार्याची माहिती दिली आणि सर्व रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. रेल्वे प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्य करण्याकरिता सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. सुरक्षित, सुखद प्रवास हे नेहेमी आपले प्राधान्य राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांना केले. 

उपिंदर सिंघ यांनी सांगितले कि, विविध संकटावर मात करत या वर्षी नांदेड विभागाने आपली वाटचाल सुरूच ठेवली आहे. या वर्षी मुदखेड ते परभणी दरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्यात आले. या वर्षी नांदेड रेल्वे विभागात 426 नवीन कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली तर 54 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली. किनवट आणि मुदखेड येथे कर्मचारी शिकायत शिबीर आयोजित केले गेले. सर्व रेल्वे स्थानकावर मुफ्त वाय-फाई सुविधा प्रदान करण्यात आली. 
 
दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण विभाग, नांदेड विभाग यांच्या देखरेखी खाली नांदेड रेल्वे विभागात विविध कार्य करण्यात येतात, महिला कल्याण विभाग, नांदेड यांनी केलेल्या विविध कार्यांचा श्री सिंघ यांनी या प्रसंगी गौरव केला.