esakal | Video : कडाक्याच्या उन्हातही मशागतीच्या कामांना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आगामी खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकरात लवकर करण्यात येवून बी-बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Video : कडाक्याच्या उन्हातही मशागतीच्या कामांना वेग

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : यावर्षी पाऊस वेळेवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत खरिपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. यात बैलजोडी, ट्रॅक्टरने मशागत केली जात आहे.

गेल्या वर्षी बेमोसमी पावसाने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षीच्या खरीपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी उत्पन्न हाती येईल या आशेने शेतकरी मशागतीत व्यस्त झाल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.  बैलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेतात मशागत करतात. मात्र, ज्यांच्याकडे बैल नाहीत त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागतो आहे.

शिवाय बैलजोडीने मशागत करताना वेळ वाया जातो व समाधानकारक मशागत होत नाही. यापेक्षा ट्रॅक्टर सहज उपलब्ध होते. शिवाय वेळेची बचत होते आणि शेतीची नांगरणी खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे. परंपरागत बैलजोडीच्या सहाय्याने मशागत न करता आधुनिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्यावर सध्या जोर दिसून येत आहे.

हेही वाचा - संकट टळतयं ः जिल्ह्यात केवळ ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता
जमिनीचे पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतापेक्षा शेनखत शेतात टाकत आहेत. परिसरातील सर्वच विंधन विहिरी व तलावांनी तळ गाठला असताना ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी यावर्षी कापूस लागवड करणार असले तरी बोंडअळी व कापसाच्या भावातील मंदी पाहता यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंता
अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला. मात्र, तरी देखील यंदा शेतकरी जोमाने व आशेने मशागतीच्या कामाला लागला आहे.  गेल्या महिनाभरापासून कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व मका अजून घरातच आहेत. लाॅकडाउन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात साठवून ठेवलेला मका व घरात थप्पी मारून ठेवलेला कापूस योग्य भाव नसल्यामुळे विकावा तरी कसा याबाबत शेतकऱ्यांना चिंता आहे.

येथे क्लिक कराच - जेंव्हा हरवलेली बायको सापडते पलंगाखाली...

शेतकऱ्यांना करावे लागणार नगदी व्यवहार
नेहमीप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे खाते कृषी केंद्राकडे उधारीचे असतात. माल विकला की पैसे देण्याची ही जुनी परंपरा आहे. यावर्षी कोरोनाने धमाल केल्याने अनेक कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनाही पैशाची नितांत गरज भासत आहे. त्यामुळे रोखीच्या व्यवहारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जुळवाजुळव करताना दमछाक होते
शेतातील पीक अजून घरीच पडून असल्यामुळे पेरणीकरीता बियाणे खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.
- रावसाहेब घुगे पाटील (शेतकरी)

loading image
go to top