मारहाण करुन लूटणाऱ्या एकास पोलिस कोठडी; विमानतळ ठाण्याचे एपीआय विजय जाधव यांची कारवाई

प्रल्हाद कांबळे
Monday, 18 January 2021

शहरात एकट्या व्यक्तीला गाठून त्याला जबर मारहाण करणे, त्यांच्या किमती वस्तू पळविणे आदी प्रकार वाढत आहेत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी वजिराबाद परिसरात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर घडला होता.

नांदेड : शहराच्या हिंगोली नाका परिसरातील श्रीरामनगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीस सिगारेट का दिली नाही म्हणून जबर मारहाण करुन त्याच्याजवळील दोन हजार रुपये किमतीचा एक मोबाईल जबरीने चोरुन नेला होता. या प्रकरणाती एकाला विमानतळ पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी रविवारी (ता. १७) रात्री अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले. 

शहरात एकट्या व्यक्तीला गाठून त्याला जबर मारहाण करणे, त्यांच्या किमती वस्तू पळविणे आदी प्रकार वाढत आहेत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी वजिराबाद परिसरात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर घडला होता. चक्क एका फर्नीचर व्यापार्‍यावर तलवार हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले होते. त्याप्रकारे ता. 16 जानेवारीच्या रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास हिंगोली नाका परिसरात हाॅटेल चंद्रलोकच्या परिसरात एका देशी दारु दुकानासमोर गेलेल्या आचारी व्यावसाय करणारा मनोज जगदीश व्यास यांना एका अनोळखी व्यक्तीने बोलावले.

हेही वाचा ग्रामपंचायत निकाल : चार दिवस नव्हे, आता पाच वर्ष सासूचे; चुरशीच्या लढतीत सुनेला चार मतांनी हरवलं

सिगारेट पिण्यासाठी व्यास याच्याकडे मागणी केली. अनोळखी व्यक्ती असल्याने माझ्याकडे सिगारेट नाही असे व्यास यांनी त्याला सांगितले. त्यावेळी पाठीमागून दुसरा एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने व्यास यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली. यात ते चक्कर येऊन खाली पडले. यावेळी खिशातील दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने काढून तेथून पळ काढला.

घाबरत मनोज व्यास याने विमानतळ पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी मला सोबत घेऊन हाॅटेल चंद्रलोक परिसरात पाहणी केली. मात्र त्या ठिकाणी हे चोरटे आढळून आले नाही. मनोज व्यास यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आनलदास यांच्याकडे देण्यात आला होता. पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे विजय जाधव यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. चोरट्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत पाठवल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken by API Vijay Jadhav of Airport Police Station for beating and robbing a man nanded news