ग्रामपंचायत निकाल : चार दिवस नव्हे, आता पाच वर्ष सासूचे; चुरशीच्या लढतीत सुनेला चार मतांनी हरवलं

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 18 January 2021

दाभड (जिल्हा नांदेड) येथील एका लढतीने जिल्हाचे लक्ष वेधले होते. ही लढत जरा हाटकेच झाली होती. ही लढत सासुबाईविरुद्ध सुनबाई अशी झाली

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नांदेड जिल्ह्यात लक्षवेधी झालेल्या सासू- सुनेच्या लढाईत सासूबाईच वरचढ ठरल्या. या लढाईत सासूबाई रेखा दादाजवार ह्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी सुनबाई संगिता दादाजवार यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला आहे. ही लढत आतापर्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची झाली. सुनबाईंनी देखील कडवी लढत दिली. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला.

चित्रपटात, नाटकात, मालीकेत सासू- सुन एकमेकांना शह- कटशह देण्याचे प्रसंग पहिले आहेतच. यात आता राजकारण, निवडणुकीची भर पडली आहे. राज्यभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जवळचे नातेवाईक, भाऊ, मित्र एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली होती.

हेही वाचापरभणी जिल्ह्यातील सेलूच्या पशुचिकित्सालयाची दूरावस्था

दाभड (जिल्हा नांदेड) येथील एका लढतीने जिल्हाचे लक्ष वेधले होते. ही लढत जरा हाटकेच झाली होती. ही लढत सासुबाईविरुद्ध सुनबाई अशी झाली. होणार सरपंच मी या गावची असे म्हणत सूनबाईनी निवडणूक लढविली. तर सासूबाईने सुध्दा तेव्हड्याच तयारीने निवडणूक लढविली. दोन्ही उमेदवारांनी  घरोघरी जाऊन प्रचार केला. मतदारांनी सासुबाईंना साथ दिली.

येथे क्लिक करानांदेडमध्ये थरार : शिवाजीनगरच्या व्यापाऱ्यावर वजिराबादमध्ये प्राणघातक हल्ला

अर्धापूर तालुक्यातील आर्थिक मिळकतीच्या बाबतीत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून दाभड ग्रामपंचायतला ओळखल्या जाते. येथील ग्रामपंचायत नऊ सदस्यांची असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. ग्रामपंचायतीच्या तीन वार्डातील आठ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक दोनमधून सासुबाई रेखा दादजवार व सुनबाई संगीता दादजवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. दोन वेगवेगळ्या पॅनलमधून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये सासूबाई रेखा दादाजवार यांनी सूनबाई संगिता दादजवार यांचा पराभव केला. रेखाबाई दादाजवार यांना 202 मते मिळाली तर सांगिता दादाजवार यांना 198 मतं मिळाली. ग्रामविकास करण्याची संधी सासुबाईंना मिळाली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat result: not four days, now five years mother-in-law nanded news