कंटेटमेंट झोनमध्ये कुंभारटेकडी परिसराची भर... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

शुक्रवारी (ता.१५) मे रोजी प्रयोगशाळेत तपासणीला पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी शुक्रवारी (ता.१५) रात्री उशिराने ४१ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नवीन १८ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले.

नांदेड : शहरात एकच दिवशी १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक रुग्ण कुंभारटेकडी परिसरातील असल्याने शनिवारी (ता.१६) सराफा बाजार परिसरापासून ते कुंभारटेकडी परिसर कंटेटमेंट झोन घोषीत करुन परिसर सील करण्यात आला आहे. 
     
नांदेड जिल्ह्यातील अहवालांपैकी गुरुवारी (ता.१४) आणि शुक्रवारी (ता.१५) मे रोजी प्रयोगशाळेत तपासणीला पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी शुक्रवारी (ता.१५) रात्री उशिराने ४१ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नवीन १८ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये कुंभारटेकडी परिसरातील एका पंचवीस वर्षीय तरुणाचादेखील समावेश आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या परिसरात चिंता वाढली आहे. संभाव्य ‘कोरोना’चा धोका टाळण्यासाठी सराफा भागातील कुंभारटेकडी परिसरासह इतर भागांमध्ये सील करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन यांनी दिली. 

हेही वाचा- रुग्णाच्या जिवाची किंमत पैशात न मोजणारा देवदूत...

कुंभारटेकडी परिसरातील सील

कुंभारटेकडी परिसरातील या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. हा परिसर सील करताना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, महापालिकेचे उपायुक्त श्री. संधू यांची उपस्थिती होती.

शनिवारी प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८४  वर पोचली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये १३ रुग्ण प्रवासी असून, चार रुग्ण करबला भागातील तर, अन्य एक रुग्ण कुंभारगल्ली सराफा भागातील रहिवाशी असल्याचे समजते. या रुग्णांवर यात्री निवास एनआरआय भवन व शासकीय आयुर्वेद रुग्णालय येथे औषधोपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ८४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

तर उपचार सुरु असलेल्या ५१ रुग्णांपैकी आठ रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, तसेच पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ४१ रुग्ण व बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये एक रुग्ण तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे एका रुग्णावर औषधापचार सुरु आहेत. 

हेही वाचा- Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह

हे आहेत कंटेंटमेंट'झोन

सध्या पीरबुऱ्हाणनगर, अबचलनगर, सांगवी परिसर, बारड (ग्रामीण), माहूर, रहेमतनगर, करबलानगर, गुरुद्वारा परिसर आणि कुंभारटेकडी परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या सक्त सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Addition of Kumbhartekdi area in Contentment Zone Nanded News