Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

शनिवारी (ता.१६) पहाटे प्रलंबित अहवालां पैकी तब्बल १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे.

नांदेड : दोन दिवसांपूर्वी तपासणी करिता लॅबमध्ये पाठविण्यात आलेल्या ३०४ अहवालापैकी शुक्रवारी (ता.१५ मे) संध्याकाळपर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. मात्र, शनिवारी (ता.१६) पहाटे प्रलंबित अहवालां पैकी तब्बल १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे. 
 
शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहलवालामध्ये १३ प्रवाशी, करबला भागातील चार तर सराफा कुंभार गल्ली येथील रहिवाशी एक अशा १८ जणांचा समावेश आहे. शुक्रवारी प्रयोग शाळेकडून एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तर्क वितर्काला उधान आले होते. ३०४ संशयित नमुने अहवालातील अनेकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर ही शक्यता शनिवारी प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालामुळे खरी ठरली आहे.  
 
हेही वाचा- पॅकेजवरुन अशोक चव्हाण यांनी साधला केंद्रावर निशाना...

नांदेडकरांची चिंता वाढली

जागतीक आरोग्य संघटनेच्या नवीन नियमावलीनुसार कोरोना रुग्णामध्ये दहा दिवसापर्यंत कोरोनाची लक्षणे न आढळल्यास त्यांना घरी सोडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी (ता.१४) एकाच दिवशी २५ त्या पूर्वी एक अशा २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने तसेच कोरोनाची लक्षणे आढळुन न आल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्हा आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे बोलले जात होते. मात्र २० पॉझिटिव्ह अहवालानंतर पुन्हा एकदा १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेडकरांची चिंता आता वाढली आहे. 
 
हेही वाचा- अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा

दोघांचा शोध लागेना

त्यामुळे नांदेडात कोरोना रुग्णांची संख्या आता ६६ वरुन ८४ वर जाऊन पोहचली आहे. यातील पाच कोरोना बाधीत व्यक्तींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन फरार कोरोना बाधीत रुग्णांचा आद्यापही शोध लागला नाही. 

नांदेडमधील परिस्थिती

- बाधितांची संख्या ८४ वर पोहचली
- २६ जणांना दिला डिस्चार्ज
- पाच जणांचा मृत्यू, दोघे फरार
- ५१ रुग्णांवर उपचार सुरू
- आजच्या नवीन रुग्णांमध्ये १३ रुग्ण प्रवासी आहेत. ४ रुग्ण करबला भागातील आहेत व १ रुग्ण सराफा, कुंभार गल्ली येथील रहिवासी असून तो शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Breaking: 18 Positives In Nanded Today Nanded News