मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याला आधुनिकतेची जोड 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 23 January 2021

या पंधरवाडा काळात मराठी चारोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा गूगल मीटच्या सहाय्याने घेण्यात आल्या. 

नांदेड : शासनाच्या निर्णयानुसार येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 1 ते 15 जानेवारी या कालावधीत "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावर्षी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने शिकविणे सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विज्ञान विभागाच्या पुढाकाराने ऑनलाइन क्लासेस चालू आहे त्याच प्रकारे विविध स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे प्राचार्य डॉ. गोरक्ष  गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले.

 

या पंधरवाडा काळात मराठी चारोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा गूगल मीटच्या सहाय्याने घेण्यात आल्या. समारोपाच्या प्रसंगी डॉ. दीपक कासराळीकर यांचे मराठी भाषेचे महत्व याविषयावर व्याख्यान ऑनलाइन पद्धतीने आयोजीत करण्यात आले होते. तंत्रज्ञान घेणारे विद्यार्थी मराठी भाषेच्या विविध स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यासाठी ऑनलाइन पद्धतीने पुढाकार घेतल्याबद्दल डॉ. कासराळीकर यांनी  संस्थेचे प्राचार्य व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा  करणाऱ्या समितीचे अभिनंदन केले.

 

प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने विविध स्पर्धा घेऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. पण यावर्षी  कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागाचे मोठे आव्हान होते. निबंध स्पर्धेसाठी 24 स्पर्धक,हस्ताक्षर स्पर्धेसाठी 53 स्पर्धक, चारोळी  स्पर्धेसाठी 10 स्पर्धक आणि मराठी व्याख्यानासाठी  दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपला सहभाग नोंदविला. याप्रमाणे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला, असे ते म्हणाले. ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषासंवर्धन पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. सं. रा. मुधोळकर, सहायक  समन्वयक डॉ. अ. अ. जोशी, प्रा.अ. नं. यादव, निबंध स्पर्धेसाठी डॉ. दे. ग. कोल्हटकर, प्रा. स. पू. राठोड, हस्ताक्षर स्पर्धेसाठी डॉ. ग. मा. डक, डॉ. सं. वि. बेट्टिगेरी चारोळी स्पर्धेसाठी प्रा.सा. ग. दूटाळ व्याखान आयोजन करण्यासाठी प्रा. अ. बा. दमकोंडवार व प्रा. वि. मं. नागलवार सहायक म्हणुन सं. र. जगताप व शेख जावेद यांनी प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Addition of modernity to Marathi language conservation fortnight nanded news