शेतीचा वाद : विष पाजलेला शेतकरी गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमठाणा (ता. भोकर) शिवारात शुक्रवारी (ता. एक) दुपारी चार वाजता घडली.

नांदेड : शेतीच्या वादातून संगनमत करुन एका शेतकऱ्यास रस्त्यात अडवून शेजाऱ्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमठाणा (ता. भोकर) शिवारात शुक्रवारी (ता. एक) दुपारी चार वाजता घडली. पीडीतावर नांदेडच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती असी की, सोमठाणा येथील शेतकरी बबन जळबा पप्पुलवाड (वय ३३) यांचे आणि त्यांच्या शेत शेजारी असलेल्या बाबू तुकाराम जंगवाड यांचा शेतातील रस्त्यावरुन मागील काही दिवसांपासून वाद होता. यापूर्वीही त्यांचे नेहमी किरकोळ वाद होत होता. महाराष्ट्र दिनानिमित्त बबन पप्पुलवाड हे आपल्या शेताकडे जात असतांना संगनमत करुन त्यांचे शेजारी बाबू तुकाराम जंगवाड, धर्मराज तुकाराम जंगवाड, संतोष लिंगोजी गादेवाड यांनी अडविले.

हेही वाचाNanded Breaking : ‘ती’ महिला सकाळी पाॅझीटीव्ह, दुपारी मृत्यू

वीष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न 

सुरवातीला त्याच्याशी वाद घालून मारहाण केली. आमच्या शेतातून जावु नको असे तुला किती वेळा सांगितले. मात्र तु का ऐकत नाही. असे म्हणून बबन पप्पुलवाड याला शेताशेजारी असलेल्या एका खड्ड्यात नेऊन विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. विष पाजल्यानंतर हे सर्वजण तेथून निघून गेले. मात्र सावध असलेल्या बबन यांनी आपल्या पत्नीस घडलेला प्रकार सागुन तातडीने शेताकडे बोलावले. पत्नी आपल्या अन्य नातेवाईकांनी घेऊन शेताकडे धावत आली. तोपर्यंत बबन पप्पुलवाड हा बेशुध्द पडला होता. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट 

त्याला नातेवाईकांनी भोकर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडत असल्याने त्याला नांदेडच्या विष्णुपूरी रुग्णालयात दाखल केले. सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक विकास पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बी. मुदीराज यांनी भेट दिली. याप्रकरणी अनुसया बबन पप्पुलवाड यांच्या फिर्यादीवरुन भोकर पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डेडवाल करत आहेत.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture dispute: Poisoned farmer is serious Nanded News