पोलिसांसह आरोग्य विभागाचीही होतेय दमछाक, कशामुळे? ते वाचाच 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. विशेष म्हणजे बाजारपेठ तसेच भाजी बाजारामध्ये नागरिक बिनधास्तपणे फिरत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. 

नांदेड : शहरातील काही मर्यादित भागातच कोरोनाचा प्रभाव होता. आता मात्र कोरोनाने सर्वत्र आपले बस्तान मांडायला सुरुवात केली आहे. या आजाराने नवीन भागात प्रवेश केला असून चौफाळा, मालेगाव रोड, फरांदेनगर, सिडको व खोजा कॉलनी भागात कोरोनाने आपले हातपाय पसरवले आहे.

धोक्याची घंटा 
शहरातील वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने ही नांदेडकरांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. शहराचे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच लोकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने आपण स्वतःहून कोरोनाला आमंत्रण देत आहोत असे दिसते. नियम काटेकोरपणे न पाळल्यास त्याचे परिणाम कोणी एका दुसऱ्याला नाही तर सर्वानाच भोगावे लागणार आहेत, हे मात्र नांदेडकरांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

हेही वाचा - Corona Update ः नांदेडमध्ये आज पुन्हा पाच पॉझिटिव्ह, संख्या गेली २०८ वर -

पाचशे रुपयासाठी लांबच्या लांब रांगा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जनधन खात्यात जमा केलेले पाचशे रुपये काढण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी अनेक किलोमीटरची पायपीट करून बॅंक गाठत आहेत.  पण तब्बल दोन-दोन तास ताटकळत बसावे लागत असून फिजिकल डिस्टन्सिंग लावण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. परिणामी सर्वत्रच फिजिकल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

हे देखील वाचा - लॉकडाउन: तब्बल 80 दिवसांनी हैद्राबाद- नांदेड- मुंबई विमानसेवा सुरु

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लाॅकडाउन करण्यात आल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामना करावा लागत आहे. सध्या गरिबांच्या जनधन खात्यात शासनाने रक्कम जमा केल्याने सदरील रक्कम उचलण्यासाठी ग्रामीण भागातील खातेदार शहरातील विविध बॅंकांसमोर मोठी गर्दी करत आहेत. या पैशांसाठी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून आणि तब्बल दोन तास बॅंकेच्या समोर असलेल्या रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ येत आहे.   

हक्काची रक्कम काढण्यासाठी कसरत
विशेष म्हणजे या रांगांमध्ये वयोवृद्ध महिलांची संख्या अधिक प्रमाणात आहे. बॅंकेसमोरील गर्दी कमी करण्यासाठी आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी प्रशासनाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. लाॅकडाउनच्या काळात ना रेल्वे, ना बस, ना कसल्याच प्रकारची वाहतूक सुविधा. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना केवळ पायपीट करत आपल्या खात्यावरील हक्काची रक्कम काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

येथे क्लिक कराच - परभणीला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले,चार मंडळात अतिवृष्टी
 

पाण्याची व्यवस्थाच नाही
शेकडो ग्राहकांची बॅंकांसमोर दररोजच रांगा लागत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे ग्राहक तहानेने व्याकुळ होत आहेत. परंतु, काही बॅंकांबाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. तसेच उन-पावसापासून बचाव व्हावा म्हणून काही बॅंक प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Along With The Police And Health Department Is Also Suffering Nanded News