esakal | आर्ची म्हणाली मराठीत बोललेलं कळत नाही... गोरमाटीत बोलू....जय सेवालाल ! 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बंजारा समाजाच्या सांस्कृतिक लेंगी स्पर्धेला रिंकू राजगुरु उर्फ आर्चीची हजेरी... 

आर्ची म्हणाली मराठीत बोललेलं कळत नाही... गोरमाटीत बोलू....जय सेवालाल ! 

sakal_logo
By
साजीद खान

माहूर ( जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील सारखणी येथे अखिल भारतीय गोर बंजारा लेंगी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सैराट चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणारी आर्ची फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने मंगळवार (ता. १६)रोजी लेंगी स्पर्धेच्या मंचावरुन उपस्थित बंजारा समुदायाला उद्देशून अय...मराठीत बोललेलं कळत नाही... गोरमाटीत बोलू....जय सेवालाल एवढे संवाद बोलताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी युट्युबवर प्रसिद्ध असलेली बंजारा समाजातील गायिका, अँकर अश्विनी राठोड हिने देखील हजेरी लावली होती.

सैराट चित्रपटाच्या निमित्ताने तरुणांना वेड लावलेल्या आर्ची उर्फ रिंकू राजगुरुची झलक बघण्यासाठी माहूर येथील हेलिपॅडवर तरुणाईने एकच गर्दी केली होती. त्यानंतर प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत तिचा ताफा निघून सारखणी तालुका किनवट येथे आयोजित अखिल भारतीय गोरबंजारा लेंगी स्पर्धेत ती सहभागी झाली. संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून बंजारा समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सैराट फेम रिंकू राजगुरु उर्फ आर्ची या प्रसिद्ध नटीला कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. निर्माता- दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांच्या पुढाकाराने आर्चीने येथे हजेरी लावली होती. सारखणी येथील हजारोच्या संख्येत उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर तिने सैराट चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग अय...मराठीत बोललेलं कळत नाही... गोरमाटीत बोलू....म्हणत जय सेवालाल म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांच्या साईनगर येथील निवासस्थानी जेवणाचा आस्वाद घेऊन माहूरकडे रवाना झाली. विशाल जाधव मित्र मंडळद्वारा आयोजित अखिल भारतीय लेंगी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थितीत निर्माता निर्देशक संजीव राठोड, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, माहूरच्या नगराध्यक्षा शीतल जाधव, भाजपचे प्रफुल राठोड, संध्या राठोड, प्रविण म्याकलवार, तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, अनिल पाटील, विनोद राठोड, बंडू नाईक व कुंदन पवार यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्याचे स्वागत जिल्हा परिषद सदस्या सुनयना जाधव व संगीता म्याकलवार यांनी केले. तर अखिल भारतीय लेंगी स्पर्धेचे आयोजन विशाल जाधव यांनी केले होते. एकंदरीत आर्चीला पाहण्यासाठी माहूरपासून सारखणीपर्यंत तरुणांनी हजरोच्या संख्येने तरुणाईंनी गर्दी केली होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे