अर्धापूरात गटविकास अधिकारी मिना रावताळे ग्रामसेवकांच्या रडारवर; बैठकांवर बहिष्कार

लक्ष्मीकांत मुळे
Sunday, 24 January 2021

घरभाडे भत्ता चालू करण्यासाठी मासिक व पाक्षीक बैठकीवर घातला बहिष्कार, गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन, पालकमंत्र्यांना भेटणार.

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे माहे जुन 2020 पासून घरभाडे भत्ता येथील गटविकास अधिकारी मिना रावताळे यांनी बंद केला आहे. जोपर्यंत घरभाडे भत्ता मिळणार नाही तोपर्यंत सर्व ग्रामसेवकांनी मासिक व पाक्षीक बैठकीवर बहिष्कार घातला आहे. तसेच काम बंद आंदोलन करणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेने पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोनामुळे ग्रामसभांना बंदी आहे. शासनाने आदेश दिले आहे की, कोरोना काळात ग्रामसेवकांचे घरभाडे कपात करु नये. येथील गटविकास अधिकारी मिना रावताळे ह्या माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या न्यायालयात जाण्याच्या धमकीला घाबरुन ग्रामसेवकांचे घरभाडे भत्ता बंद केला आहे.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, अर्धापूर यांना पत्र लिहून ग्रामसेवकांकडून हमीपत्र, शपथपत्र घेवून तात्काळ घरभाडे भत्ता देण्याचे आदेशीत केले. पण आजपर्यंत गटविकास अधिकारी यांनी घरभाडे भत्ता दिला नसल्यामुळे ग्रामसेवकांनी आठ जानेवारीला निवेदन दिले. घरभाडे भत्ता न दिल्यास ता. 19 जानेवारी पासून मासिक व पाक्षीक बैठकीवर बहिष्कार टाकला. ग्रामसेवकांचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटणार. अर्धापूरचे गटविकास अधिकारी ह्या उठसुठ माहिती अधिकार टाकणाऱ्या कार्यकर्ते यांना घाबरुन ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना कारण नसताना विनाकारण त्रास देत आहेत. पालकमंत्री अशोकचव्हाण यांना भेटून सर्व परिस्थिती सांगणार आहोत अशी माहिती ग्रामसेवक संघटनेने दिली.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ardhapur, group development officer Mina Rawatale boycotted the meetings on the radar of gram sevaks nanded news