अर्धापूर : भामट्याने मिठाईवाल्याला २३ हजार तर एटीएमद्वारे शेतकऱ्याला ४० हजाराचा फटका

लक्ष्मीकांत मुळे
गुरुवार, 9 जुलै 2020

मिठाईचा आॅर्डर आहे आशी बतावणी करून २३ हजाराची फसवणूक करून अज्ञात भामटा फरार झाल्याची घटना बुधवारी (ता. आठ) दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास झाली

अर्धापूर : अर्धापूर शहरांत दिवसागणिक फसवणूकीच्या घटना वाढत आहेत. एटीएम केंद्रातून अज्ञात भामट्याने एटीएम बदलून ४० हजार लंपास केले. तर तहसील कार्यालयात मिठाईचा आॅर्डर आहे आशी बतावणी करून २३ हजाराची फसवणूक करून अज्ञात भामटा फरार झाल्याची घटना बुधवारी (ता. आठ) दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास झाली. एटीएम प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. शहरात फसवणूकीच्या घटना वाढत आसून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक झाले आहे. तर आज्ञात भामट्यांचा शोध लावून मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

अर्धापूर बसस्थानक परिसरातील एका मिठाईच्या दुकानात बुधवारी दुपारी एक अज्ञात भामटा आला व आपण तहसील कार्यालयात चालक आहे, अशी बतावणी केली. मिठाईवाल्यास आॅर्डर घेण्यासाठी तहसील कार्यालयात नेले. भामट्याने मिठाईवाल्याचा विश्वास बसावा यासाठी तहसील कार्यालयातील शिपाई व दुस-या मजल्यावरील दुय्यम नोंदणी कार्यालयात जावून काही तरी बातचित झाल्याचे नाटक केले. त्यानंतर मिठाईची यादी करून बिल तयार करण्याचे सांगितले. हे बील २७ हजाराचे झाले. 

तहसिलदार साहेबांकडे दोन हजार रूपयाचे बंडल आहे

तहसिलदार साहेबांकडे दोन हजार रूपयाचे बंडल आहे. तसेच त्यांना कामाची गडबड आहे. साहेब दोन हजाराच्या २५ नोटा देणार आहेत तु लवकर २३ हजार घेऊन ये व ५० हजार घेऊन जा असे सांगून तहसिलदाराची गाडी साफ करण्याचे नाटक केले. लाॅकडाऊननंतर मोठा आॅर्डर मिळत असल्यामुळे शेजारी दुकानदार, मित्र यांच्याकडून पैसे जमा करून तहसील कार्यालयाच्या परिसरात २३ हजार अज्ञात भामट्याला दिले. सदरील भामट्याने बिलावर शिक्का मारतो म्हणून कार्यालयात गेला व मिठाईवाल्याची नजर चुकवून फरार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर खूप मोठा धक्का मिठाईवाल्यास बसला. त्यांनी आपली कशी फसवणूक झाली याची हकीकत पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना सांगितली. आधिच कोरोनामुळे दुकाने बंद, विक्री कमी त्यात अशा प्रकारे फसवणूक झाल्याने खुप मोठा अर्थिक फटका बसला.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील हॉटेल, अतिथीगृह व लॉज सुरू
 

एटीएमकार्डची अदलाबदल करुन ४० हजार लंपास 

तर दुसऱ्या घटनेत अज्ञात भामट्याने बसस्थानक परिसरातील एटीएम केंद्रात एटीएमची आदलबदल करून ४० हजार काढून घेतले. शहापूर येथील उत्तम रावसाहेब पवार अर्धापूर येथील एटीएम केंद्रात पैसे काढत होते. त्यांच्या मागे अज्ञात भामटा होता. पवार पैसे काढत असतांना काही तांत्रिक अडचण आली. तुमचे कार्डं द्या मी पैसे काढून देतो आसे म्हणून पवार यांच्याकडील कार्ड भामट्याने घेतले. पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याच गडबडीत पवार यांची नजर चुकवून भामट्याने त्याच्या कडील कार्ड पवार यांना दिले व पवार यांचे कार्डं वापस दिले नाही व तो फरार झाला. या भामट्याने पवार यांच्या कार्डचा उपयोग करून दुस-या एटीएम केंद्रातून ४० हजार काढून घेतले. पैसे काढल्याचा संदेश पवार यांना आल्यावर त्यांना खुप मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ बॅकेशी संपर्क करून कार्डं बंद केल्याने पुढील रक्कम शिल्लक राहिली. 

शासकीय कार्यालयातील कॅमेरे असून नसल्यासारखे आहेत. 

पवार यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शहरात फसवणूकीच्या घटना सतत होत आहेत .शहरातील सार्वजनिक ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव धुळखात पडून आहे. तर शासकीय कार्यालयातील कॅमेरे असून नसल्यासारखे आहेत. 
 

शब्दांकन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ardhapur: Sweetie hits Rs 23,000 for sweets, farmer gets Rs 40,000 through ATM nanded news