सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास भरभरुन योगदान द्यावे- डॉ. विपीन इटनकर

file photo
file photo

नांदेड : सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनात देशप्रेमाच्या भावनेतून नांदेड जिल्ह्याने नेहमीच चांगला पुढाकार घेऊन निधी संकलनात भरीव योगदान दिले आहे. यावर्षीच्या ध्वजनिधी संकलनातही शासनातील विविध विभागांसह समाजातूनही देशप्रेमाच्या भावनेतून भरीव निधी दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. या आर्थीक वर्षाच्या ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ नियोजन भवनात नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे), पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गतआर्थीक वर्षासाठी शासनाने जिल्ह्याला 35 लाख 50 हजार एवढे उद्दीष्ट दिले होते. नांदेड जिल्ह्याने हे उद्दीष्ट 124.14 टक्क्यांनी पूर्ण केले. या आर्थीक वर्षासाठीही शासनाने तेवढेच उद्दीष्ट दिले असून नांदेड जिल्ह्यातून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक निधी जमा करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

ध्वजनिधी जमा करण्याविषयी "हाच संकल्प हिचसिद्वी" उपक्रम 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर यांनी माजी सैनिक व त्यांच्या महिला बचतगटास सर्वेातोपरी मदत करण्याचे सांगितले. ध्वजनिधी जमा करण्याविषयी "हाच संकल्प हिचसिद्वी" उपक्रम राबवून प्रत्येक अधिकारी कर्मचारी व नागरीकांना आवाहन करुन निधी जमा करण्यात येईल असे आश्वासित केले. पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सेवारत सैनिक किंवा माजी सैनिक यांच्या काही पोलिस संरक्षण किंवा अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी आहेत. त्यासाठी प्राथमिकतेने लक्ष देवून निपटारा करण्यात येईल असे माजी सैनिकांना सांगितले.

यावेळी जिल्ह्याला दिलेले उद्दीष्ट वेळेच्या आत पूर्ण करुन गत आर्थीक वर्षात निधी शासनास जमा केल्याबद्दल शासनाच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या निधी संकलनात जिल्ह्यातील शासकिय कार्यालय, शाळा तथा महाविद्यालयांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचाही प्रातिनिधीक सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन करण्यात आला.  

कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सी. एस. डी कॅण्टीन, मुलींचे वसतिगृह व पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरु करण्याबाबत विनंती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना केली.

संजीवनी माजी सैनिक महिला बचतगटाकडून रक्तदान शिबीर

स्वंयरोजगारासाठी माजी सैनिक महिला बचतगटांना सुविधा केंद्र प्राथमिकतेने आंवटीत करण्यात येतील. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संजीवनी माजी सैनिक महिला बचतगट यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यामधून शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक कर्मचारी संघटना, भारतीय माजी सैनिक संघटना, विरसैनिक ग्रुप यांनी उत्साहने भाग घेतला. कार्यक्रमात विरनारी, विरमाता व विरपिता यांचा सत्कार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधिक्षक नांदेड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले.  माजी सैनिक पाल्य धनंजय माधव केन्द्रे यास या वर्षीचा एअर मार्शल व्ही. ए. पाटणकर पुरस्कार माजी सैनिक विधवा पाल्य यांनी इयत्ता 10 वीमध्ये लातूर विभागात 96 प्रतिशत मार्कस प्राप्त केल्याबाबत प्रदान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता कार्यालयाचे बुधसिंग शिसोदे, सुभे काशिनाथ ससाने, सुर्यकांत कदम, सुरेश टिपरसे, माधव गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com