अशोक चव्हाण मुंबईत दाखल, प्रकृती ठणठणीत...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी रात्री ते मुंबईला पोहचले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याची माहिती कॉँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली. 

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले. रात्री उशीरा श्री. चव्हाण मुंबईत पोहचले असून त्यांच्यावर ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोनद्वारे श्री. चव्हाण यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात गेल्या दोन महिन्यापासून नांदेड तसेच मुंबई येथे सातत्याने काम करत असताना पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागन झाल्याचा अहवाल रविवारी (ता. २४) रात्री नऊ वाजता प्राप्त झाला. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठणठणीत असून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारासाठी श्री. चव्हाण हे नांदेडहून मुंबईला सोमवारी सकाळी अकरा वाजता रवाना झाले.

हेही वाचा - Video - पालकमंत्री अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला रवाना...

मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस
पालकमंत्री चव्हाण यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रविवारी (ता. २४) सकाळी दहा वाजता त्यांचा कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला. या स्वॅबचा अहवाल त्याच दिवशी रात्री प्राप्त झाला. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता काबरानगर परिसरातील आशा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात पालकमंत्री चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची वार्ता राज्यभर पसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी मुंबईस येण्याचा आग्रह धरला. 

ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये होणार उपचार
पालकमंत्री श्री. चव्हाण सोमवारी सकाळी अकरा वाजता कार्डियाक अम्ब्युलन्सद्वारे औरंगाबाद, पुणे मार्गे मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी काँग्रेसचे विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, माजी नगरसेवक सुभाष रायबोले, नगरसेवक संदीप सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत निष्णात डॉक्टरांची टीम आहे. मुंबई येथील ब्रिचकँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे.

साहेब लवकर बरे होतील 
माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत म्हणाले की, मुंबईत असताना अशोक चव्हाण यांनी तेथील परिस्थिती पाहून दोनदा स्वॅब तपासणीसाठी दिला होता आणि तो निगेटिव्ह आला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या परवानगीने नांदेडला आले. नांदेडला ते होम क्वारंनटाइन होते. काल रविवारी सकाळी त्यांना शंका आल्याने स्वॅब तपासणीसाठी दिला आणि दुर्देवाने पॉझिटिव्ह आला. पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईला गेले असून साहेब लवकरच बरे होतील, असेही श्री. सावंत यांनी सांगितले. 

हेही वाचलेच पाहिजे - Video - ताणतणाव घालवा...मेंदूचे आजार पळवा... - डॉ. संदीप देशपांडे

नेत्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी
पालकमंत्री चव्हाण यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही तीव्र लक्षणे नाहीत. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे. पालकमंत्री चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळाल्यानंतर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री गुलाबनबी आझाद, अहेमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan arrives in Mumbai, in good health ..., Nanded news