सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईचा अशोक चव्हाण यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पर्यायी पीक नियोजनाचे आवाहनही केले आहे. 

नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच झाली नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातून समोर येत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु, अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी या संदर्भात बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारीसुद्धा केल्या आहेत. 

हेही वाचा - रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा...  

पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती मागवली आहे. ते स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी कारणीभूत ठरलेल्या बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही आश्‍वासन पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. 

सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना फटका
कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असताना आता संपूर्ण देशाची दारोमदार खरीप हंगामावर आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे चव्हाण यांनी बजावले आहे. 

शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचे नियोजन करावे
यासंदर्भात शासन कारवाई करेल. मात्र, दरम्यान शेतकऱ्यांनी वेळ न दवडता शेतातील ओलावा पाहून पर्यायी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दुबार पेरणीसाठी कृषितज्ज्ञांनी मूग, उडीद, तूर, सूर्यफूल या पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचलेच पाहिजे - मियावाकी वृक्षलागवडीसाठी पुढाकार घ्यावा.....कोण म्हणाले ते वाचा 

आमदारांसह इतरांनीही केल्या तक्रारी
दरम्यान, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह इतर संस्था, संघटनांनी देखील याबाबत तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीनचे बोगस बियाणे देऊन कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा बोगस बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषद प्रतोद आमदार अमर राजूरकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री झाल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आले असून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी नांदेड - दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी केली आहे. शेतकऱ्यांपुढे सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे एक नवे आर्थिक संकट उभे टाकले आहे. या संदर्भात शासन योग्य ती कारवाई करेलच परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांनी बोगस बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्याविरुध्द ग्राहक मंचाकडे दाद मागावी, असे आवाहन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan warns of stern action in soybean fraud case, Nanded news