
प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करत जशास तसे उत्तर देऊ
नांदेड - सदैव विकासाचा दृष्टिकोन बाळगुनच आपण प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. सत्ता येते आणि जाते. आताची परिस्थिती पाहता आगामी काळात एक प्रभावी विरोधी पक्षाचे प्रभावीपणे काम करणार असून ही कामे करताना विकासकामांसाठी परिश्रम आणि संघर्ष करण्याची तयारी आहे. आगामी काळात राजकीय विरोध झाल्यास सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. ११) दिला.
कुरूळा (ता. कंधार) येथील जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब गोमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, एकनाथ मोरे, नारायण शिरमनवार, सतीश देवकत्ते, भास्कर जोमेगावकर, पप्पू कोंडेकर, विजय येवनकर आदींची होती.
श्री. चव्हाण म्हणाले की, मागील अडीच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. कधीच पक्षीय दृष्टिकोन ठेवला नाही. यापुढेही जनतेच्या कामासाठी सदैव तयार आहे. वैयक्तीक पातळीवर जावून मी कधीच कोणाचा विरोध केला नाही, परंतू जिल्ह्यातील काही मंडळींना माझे नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही. माझे नाव घेतल्याने आपण मोठे होतो, असे त्यांना वाटते.
खालच्या पातळीवर येवून विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी बाळासाहेब गोमारे यांच्यासमवेत कुरुळा सर्कलमधील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
Web Title: Ashok Chavan Zilla Parishad Member Balasaheb Gomare Joined The Congress Party Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..