
जागेच्या वादातून भावकीमध्ये तुंबळ हाणामारी,परस्पर विरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल
भोकर (जिल्हा नांदेड) : घरगुती वादातून भावकीतील एका जेष्ठ नागरिकाच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भोकर शहराच्या बिलालनगर भागात ता. १७ जून रोजी घडली. यानंतर दोन गटात तुंळ हाणामारी झाली. या प्रकरणी एकमेकाच्या विरोधात जबरी चोरीसह आदी गंभीर कलमान्वये दहा जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अब्दुल मुबीन यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले की आरोपी अब्दुल सत्तार, अब्दुल तनवीर, अब्दुल्ल अवेजसह इतर दोन अनोळखीने ता. १७ जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरी येऊन गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून एक तोळ्याची सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून घेतल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डेडवाल करत आहेत.
हेही वाचा - नांदेडमध्ये ‘या’ ठिकाणी वर्षावासानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण
अंगावर रॉकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न
तर दुसऱ्या फिर्यादीमध्ये अब्दुल सत्तार अब्दुल वाहेद (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले की आरोपी अब्दुल मुबीन, अब्दुल सलिम, अब्दुल समीर, जावेद अन्वर, सोनू राजा आदी पाच जणांनी अब्दुल सत्तार यांच्या बिलालनगर येथील घरी जाऊन सकाळी साडेनऊच्या साडेनऊच्या सुमारास फिर्यादीच्या घराचा दरवाजा लोखंडी रॉडणे तोडून अब्दुल सत्तार यांच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ठार मारण्याची धमकी देऊन खिशातील २० हजार रुपये जबरीने काढून घेतले. त्यांच्या तक्रारीवरुन वरील आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. कांबळे करत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट
भावकीतील वादातून झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही गट भोकर पोलिस ठाण्यात हजर झाले. यात काही जण जखमी होते. पोलिसांनी जखमींना भोकर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारीबाळासाहेब देशमुख आणि पोलिस निरिक्षक विकास पाटील यांनी भेट दिली. तसेच तपासीक अंमलदारांना तपासाच्या योग्य सुचना दिल्या.