नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लागले लक्ष

अभय कुळकजाईकर
Friday, 3 July 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून नांदेड महापालिकेचा अर्थसंकल्प जुलै महिना आला तरी अजूनही सादर झाला नाही. त्यामुळे आता अर्थसंकल्प कधी सादर होणार? याकडे लक्ष लागले आहे.

नांदेड - नांदेड महापालिकेचा अर्थसंकल्प कोरोना आणि लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यापासून सादर होऊ शकला नाही. आयुक्तांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींनी याबाबत बैठक घेतली. मात्र, नंतर कोरोना आणि लॉकडाउनमुळे सादर होऊ शकला नाही. त्यामुळे आता तो कधी सादर होणार याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.  
 

दरम्यान, स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा यांनी याबाबत महापौर दीक्षा धबाले आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना अर्थसंकल्पावर विशेष सभा घेण्यासंदर्भात नुकतेच पत्र दिले आहे. त्यामुळे आता यावर महापौर काय निर्णय घेणार याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले

आयुक्तांनी केला होता सादर
नांदेड महापालिकेचा २०१९-२०२० चा सुधारित आणि २०२०-२०२१ चा मूळ अर्थसंकल्प प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी ता. सहा मार्च रोजी सादर केला होता. महापालिका प्रशासनाच्या वतीने २०१९-२०२० चा मूळ अर्थसंकल्प ९३८ कोटी ४० लाख रुपयांचा होता. या कालावधीचा सुधारित अर्थसंकल्प ७१६ कोटी ७० लाख रुपयांचा होत असून, २०२०-२०२१ चा ६४५ कोटी ६५ लाख रुपयांचा आणि एक लाख २२ हजार १२८ रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. 

स्थायीच्या सभापतींनी घेतली बैठक
आयुक्तांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सभापती अमितसिंह तेहरा यांनी सदस्यांच्या उपस्थितीत ता. १६ मार्च रोजी बैठक घेतली आणि सदस्यांच्या सूचना मागविल्या. त्यानंतर कोरोना आणि टाळेबंदी सुरू झाल्यामुळे अर्थसंकल्पाची सभा झाली नाही. आता हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या वतीने सर्वसाधारण सभेत महापौरांसमोर सभापतींना सादर करायचा आहे. 

महापौर घेणार निर्णय
स्थायी समितीच्या सभापतींनी अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर सादर केल्यानंतर महापौर पदाधिकारी आणि सदस्यांच्या सूचना मागवून त्यावर चर्चा करून त्याला सर्वानुमते मंजुरी देतील. दरम्यान, कोरोना आणि टाळेबंदीमुळे महापालिकेची यंत्रणा त्या कामाला लागली; तसेच पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि विभागप्रमुखांच्या उपस्थितीत सभा नियम व अटींमुळे कशी घेणार? असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे अजूनही अर्थसंकल्पीय विशेष सभेला मुहूर्त लागला नाही. 

हेही वाचलेच पाहिजे - कोरोना ब्रेकिंग : नांदेडला चारशेचा आकडा पार, शुक्रवारी १६ रुग्ण सापडले

स्थायीकडून अर्थसंकल्प तयार 
स्थायी समितीच्या वतीने आम्ही अर्थसंकल्प तयार केला असून, महापालिकेची विशेष अर्थसंकल्पीय सभा घेण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र महापौर आणि आयुक्त यांना दिले आहे. महापौर याबाबत लवकरच निर्णय घेतील. त्यानुसार अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. 
- अमितसिंह तेहरा, सभापती, स्थायी समिती. 

निर्णय लवकरच अपेक्षित
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा अपेक्षित असून तशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे आता याबाबत महापौर, सभागृह नेते व इतर पदाधिकारी मिळून विशेष अर्थसंकल्पीय सभेबाबत ठरवतील. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. 
- डॉ. सुनील लहाने, आयुक्त. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attention was paid to the budget of Nanded Municipal Corporation, Nanded news