esakal | अवतार दिन विशेष : श्री चक्रधर स्वामी कलीयुगातील सर्वस्पर्शी अवतार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गेल्या ८०० वर्षापासून संपूर्ण भारतभर स्वामींचे तत्वज्ञान सूर्यापेक्षाही जास्त क्षमतेने तळपत आहे. त्या काळीचे प्रसिध्द विद्वान व स्वामींचे शिष्य श्री माहिंमभट्ट यांनी आचार्य श्री नागदेव यांच्या सल्ल्याने लीळाचरित्र ग्रंथाची रचना केली.

अवतार दिन विशेष : श्री चक्रधर स्वामी कलीयुगातील सर्वस्पर्शी अवतार

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : ता. २० ऑगष्ट हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन. स्वामींच्या अवतारास ८०० वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या ८०० वर्षापासून संपूर्ण भारतभर स्वामींचे तत्वज्ञान सूर्यापेक्षाही जास्त क्षमतेने तळपत आहे. त्या काळीचे प्रसिध्द विद्वान व स्वामींचे शिष्य श्री माहिंमभट्ट यांनी आचार्य श्री नागदेव यांच्या सल्ल्याने लीळाचरित्र ग्रंथाची रचना केली. मराठी वाङ्‌मयातील हा पहिला (आद्य) मराठी गद्य स्वरूपातील ग्रंथ होय. 

स्वामींचा कालखंड हा ज्ञानेश्र्वरापूर्वी शंभर वर्षांचा आहे. पण लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती १२०८ मध्ये झाली. या ग्रंथाची निर्मिती अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथील वाजेश्र्वरी या ठिकाणी झाली. श्री नागदेवाचार्यांच्या सल्ल्यानेच श्री केशीराज व्यास यांनी लीळाचरित्रातील तत्त्वज्ञान व आचार धर्म विषयक वचने हंसक्षीर न्यायाने निवडून सूत्रपाठ ग्रंथाची रचना केली.

स्वामी द्वैतवादी मताचे होते

श्री चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान हे सर्वव्यापी होते. स्वामी द्वैतवादी मताचे होते. अद्वैतवादी म्हणजे "अहं ब्रम्हास्मी" मी ब्रम्ह आहे. सर्वकांही ब्रम्हच आहे. पण स्वामी द्वैतवादी असल्यामुळे त्यांनी जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे चार पदार्थ स्वतंत्र व नित्य असल्याचे सांगितले.

हेही वाचाइसापूर धरणाचा पाणीसाठा 75 टक्क्याच्या पुढे पैनगंगा नदीला पूर- सावधानतेचा ईशारा

महाराष्ट्रात त्यावेळी देवगीरीच्या यादवांचे राज्य होते

महाराष्ट्रात त्यावेळी देवगीरीच्या यादवांचे राज्य होते. यादवांचा प्रधान हेमाद्री हा होता. राज्यात सगळीकडे रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अपसमज, गैरसमज, अज्ञान, वृत्तवैकल्य, उपासतापास, वर्णभेद, जातीभेद व स्त्री- पुरूष असमानता याची बजबजपुरी माजली होती. यामुळे सर्व समाज पोखरून गेला होता. विधवा व बाल विधवा या अतोनात हाल अपेष्ठात जीवन जगत होत्या. शुद्र व स्त्रियांना ज्ञानार्जनाचा अजिबात अधिकार नव्हता. ह्या सर्वास प्रधान हेमाद्री पंडिताचा पाठिंबा व फुस होती. हेमाद्रीला विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती.

स्त्री आणि शुद्र यांना ज्ञानाचा अधिकार असल्याचे सांगितले 

अशा भयावह व कठीण प्रसंगी श्री चक्रधर स्वामींनी समतेचा व स्त्री आणि शुद्र यांना ज्ञानाचा अधिकार असल्याचे सांगितले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. पुरूषांना त्यांनी "तुमचा तो जीव आणि स्त्रियांचा काय ?  जीवलीया काय ? हा प्रश्र्न केला?" स्त्री-पुरुषांचा जीव सारखाच व दोघांच्याही जिवांना ज्ञान मिळवण्याचा व भक्तीचा समान अधिकार असल्याचे प्रतिपादन केले. सवर्ण व शुद्रांना सुध्दा हाच न्याय दिला. स्वामींच्या भक्तामध्ये तत्कालीन महार, मांग, चांभार, आदिवासी, मुसलमान, सवर्ण व स्त्रियांचा सहभाग होता.
श्री चक्रधर स्वामींच्या सान्निध्यात नागदेव, म्हाइंमभट्ट, नाथोबा, कोथळोबा, वैराग्य देव, केसोबास, बाईसा, शांता बाईसा, महादाईसा, आबाईसा, साधा, आऊसा, खेई, गोई, पोमाईसा अशा कितीतरी स्त्रिया व पुरूष होते. त्यातील म्हाइंमभट्ट, केसोबास हे लेखक तर महादाईसा कवयित्री होती. म्हादंबेचे धवळे या नावाने आजही त्यांचे काव्य प्रसिद्ध आहे. श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलेले तत्त्वज्ञान स्वतंत्रपणे सूत्रपाठ या ग्रंथात उपलब्ध आहे. तसेच आजही महानुभाव पंथ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली आदी अर्ध्यापेक्षा जास्त भारतात पसरलेला आढळतो.

शब्दांकन- जनार्दन ठाकूर (शिंदे), सिडको, नांदेड.

loading image
go to top