जिल्हा परिषद शाळेतील जीर्ण दस्तऐवजाला अपडेटची प्रतिक्षा

प्रमोद चौधरी
Wednesday, 30 September 2020

आज घडीला बहुतांश विद्यार्थी हयात नाहीत. परंतु, त्यांच्या पाल्यांना आवश्यक दस्तऐवज तयार करताना वडीलोपार्जित नोंदी असणाऱ्या रेकॉर्डची गरज पडत असल्याने त्यांना गावातील शाळेत धाव घ्यावी लागत आहे.

नांदेड : जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने दस्तावेज जीर्ण झाले असून,  कुठे कुठे या जुन्या दस्तावेजांना वाळवी लागली आहे. दस्तऐवज आतापर्यंत अपडेट झालीच नसल्याने भवितव्याचा आधार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी ही सर्व जुने दस्तावेज आधुनिक काळात अपडेट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

देश स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ग्रामीण भागात जिल्हा परिषदमार्फत शिक्षणाची दालने निर्माण करण्यात आली आहे. या शाळांनी अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या अनुभवल्या आहेत. शाळा त्याच आहेत परंतु प्रारुपमध्ये बदल करण्यात आले आहेत. या शाळेत अनेक पिढ्यांचे दाखले रजिस्टरमध्ये जन्म तारखांच्या नोंदीसह कागदपत्रे उपलब्ध आहेत. गेल्या ५० वर्षापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे, यापैकी आज घडीला बहुतांश विद्यार्थी हयात नाहीत. परंतु, त्यांच्या पाल्यांना आवश्यक दस्तऐवज तयार करताना वडीलोपार्जित नोंदी असणाऱ्या रेकॉर्डची गरज पडत असल्याने त्यांना गावातील शाळेत धाव घ्यावी लागत आहे.

हेही वाचा - सोपान शिंदे यांनी तुती लागवडीतून केला शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत

परंतु शाळेत जुने रेकॉर्ड बघून थक्क झाल्यासारखे वाटत आहे. जिल्हा परिषद शाळेत असणारे जुने रेकॉर्ड जीर्ण झाले असून वारंवार रजिस्टरची उलथापालथ करण्यात येत असल्याने रेकॉर्डची अवस्था वाईट झाली आहे. महत्त्वाचे रेकॉर्ड असल्याने मुख्याध्यापक त्यांचे जतन करण्याचे प्रयत्न करतात. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना बहुतांशरित्या यश येत नसल्याने कापडात गुंडाळून ठेवलेले हे रेकॉर्ड वाळवी फस्त करत असल्याचे वास्तव आहे.  

हे देखील वाचा - परभणीतील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला दंडाची शिक्षा ​

जिल्हा परिषद गंभीर नाही
जुन्या पिढीच्या रेकॉर्डचे जतन करताना जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नसल्याची बाब त्यामुळे उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये १९४९ पूर्वीपासूनचा जीर्ण रेकॉर्ड रजिस्टरमध्ये आहे. या रजिस्टरची पाने फाटक्या अवस्थेत आहे. जातीचे प्रमाणपत्र तयार करताना पाल्यांना याच नोंदीची आवश्यकता असते. आज घडीला हा रेकॉर्ड दिसत असला तरी येत्या १० वर्षानंतर जीर्ण रजिस्टर दिसणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

येथे क्लिक कराच - नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस

अपडेट करण्याच्या सूचनाच नाहीत
जुने रेकॉर्ड अपडेट करण्याच्या सूचना तथा आदेश जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेले नसल्याने नाहक जनता त्रस्त होत आहे. वास्तविक ग्रामपंचायतीसह इतर विभागांतीलही जुना रेकॉर्ड अपडेट करण्यात येत आहे. परंतु, जिल्हा परिषद शाळांतील महत्त्वपूर्ण रेकॉर्डकडे कानाडोळा करत असल्याचे एका मुख्याध्यापकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. 
 
शाळा संगणकीकृत, पण...
सद्यस्थितीत जवळपास सर्वच जिल्हा परिषदांच्या शाळा डिजिटल झालेल्या आहेत. या शाळेकडे संगणक आहेत.  परंतु जुना रेकॉर्ड अपडेट करण्यात आलेला नाही. यामुळे रेकॉर्ड सांभाळताना मुख्याध्यापकांची चांगलीच धांदल उडत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awaiting Update On Document Zilla Parishad School Nanded News