कर्जाचा हफ्ता भरावा की नाही? काय म्हणतात बॅंकवाले

शिवचरण वावळे
बुधवार, 27 मे 2020

दोन महिन्यापासून हाताला काम नसल्याने हप्ता भरावा की नाही, हप्ता नाही भरला तर काय होईल?. असे अनेक प्रश्न मनात उपस्थित होत आहेत. हप्ता भरावा की न भरावा, अशा संभ्रमावस्थेत असलेल्या नागरीकांना योग्य तो सल्ला मिळत नाही.

नांदेड : कोरोनाचा आजार वाढत असल्याने देशात एका पाठोपाठ एक असे सलग चार लॉकडाउन कायम ठेवले गेले. तसेच लॉकडाउन वाढणार असल्याने राज्य सरकारने यापूर्वीच कुठल्याही कर्जाचे हप्ते जबरदस्तीने वसूल करु नयेत, अशी विनंती बँकेला केली. परंतु अनेक सहकारी बँक, बचतगट, खासगी फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांना आता इएमआय हप्ते भरण्यासाठी फोन कॉल्सद्वारे तगादा सुरु झाला आहे. 

दोन महिन्यापासून हाताला काम नसल्याने हप्ता भरावा की नाही, हप्ता नाही भरला तर काय होईल?. असे अनेक प्रश्न मनात उपस्थित होत आहेत. हप्ता भरावा की न भरावा, अशा संभ्रमावस्थेत असलेल्या नागरीकांना योग्य तो सल्ला मिळत नाही. विनाकारण बॅंकेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे बँकेकडून व्यवसाय, उद्योग, वाहन आणि घरासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे अशी स्थिती निर्माण झाली.

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात दोन खूनाच्या घटनांनी खळबळ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

कर्जाचा हप्ता भरावा कसा

एकीकडे सरकार तीन महिन्यापर्यंत कुठलाही हप्ता (इएमआय) भरु नका, असे सांगत असताना अनेकांना फोन कॉल्सद्वारे पैसे भरण्याची मागणी होत आहे. अनेकांच्या बँक खात्यातून हफ्ता वजा झाला आहे. त्यामुळे मागील ६० दिवसापासून हाताला काम नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला मात्र हफ्ता फेडायचा कसा? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

हेही वाचा- ‘आरबीआय’च्या निर्देशाशिवाय कर्जवाटप अशक्य....कोण म्हणाले ते वाचा

कर्जाच्या हप्त्यावरील व्याज चुकणार नाही

शिवाजीनगर शाखेचे एसबीआय बँक सहाय्यक प्रबंधक उमेश डाखे यांनी मात्र हप्ता भरावा की नाही आणि हप्ता कुणी भरावा? यावर माहिती दिली. ते म्हणाले की, ज्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यांनी हप्ता भरण्यास हरकत नाही. परंतु ज्यांच्याकडे पैसेच नाहीत. अनेक दिवसापासून ज्यांच्या हाताला काम नाही त्यांनी तीन महिन्यापर्यंत हप्ता भरला नाही तरी चालेल. परंतु त्यावर लागणारे व्याज कुणालाही चुकणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जर नियमित हफ्त्यांची परतफेड केली तर, चांगलीच गोष्ट आहे. ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत त्यांनी सरकारकडून दिल्या जात असलेल्या तीन महिन्याच्या हप्ता न भरण्याच्या संधीचा लाभ घ्यावा. 

व्यावसायिकांना दिलासा
मागील दोन महिन्यापासून बंद असलेल्या उद्योग व्यवसायिकांना बँकेमार्फत विनातारण कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. यामुळे दोन महिन्यापासून बंद असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय त्यांचा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येण्यास मदत मिळणार आहे. ज्यांना व्यवसायासाठी पैशांची गरज आहे. त्यांनी बँकेकडे आॅनलाईन अर्ज केल्यास त्यांना कर्ज दिले जाणार आहे. 
- उमेश डाखे, सहाय्यक प्रबंधक, एसबीआय बँक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bankers Say Whether To Pay The Loan Installment Or Not Nanded News