नांदेड जिल्ह्यात दोन खूनाच्या घटनांनी खळबळ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

बिलोली तालुक्यातील आटकळी येथील थरार; रामतीर्थ पोलिसांनी दाखल केला गुन्हा. तर लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंजरने मित्राचा खून करणाऱ्या नांदेडच्या तिघांवर गुन्हा.

नांदेड : जिल्ह्यातील नागठाणा (ता. उमरी) येथील दुहेरी खूनाची घटना ताजी असतांनाच जिल्ह्यात पुन्हा दोन खूनाच्या घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण  झाला आहे. गुन्हेगारांना कायद्याची व पोलिसांची वचक राहिली नसल्याने अशा गंभीर घटना घडत असल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. बिलोली तालुक्यात वडिलाचा मुलाने तर नांदेडमध्ये मित्राचा मित्रांनी खून केल्याच्या घटना मंगळवारी (ता. २६) रात्री उघडकीस आल्या. याप्रकरणी रामतिर्थ व लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती असी की, आटकळी (ता. बिलोली ) गावालगतच घर बांधून असलेल्या मारुती रघुपती याला दारूचे व्यसन होते. दारुसाठी घरातील सर्व सदस्यांना तो नेहमी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. मंगळवारी (ता. २६) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मारुती रघुपती हा नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. दारू पिल्यानंतर घरी त्याने मुलाशी व पत्नीशी वाद घातला. यावेळी मारुती रघुपती यांची बहीणही त्या ठिकाणी होती. आत्याच्या देखतच बाप अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याने मारूती रघुपतीचा मुलगा भुजाजी (वय २०) याचा राग अनावर झाला.

हेही वाचा -  निर्वाणरुद्र पशुपतींचा खून का केला, वाचा आरोपीच्या तोंडून
 
मुलाने संपविले जन्मदात्यास

बापाचा सतत होणारा त्रास एकदाचा खतम करून टाकतो असं म्हणत भुजाजीने धारदार चाकूने मारुतीला भोसकले. याच वेळी भुजाजीने वडिलांचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बापाचा काही क्षणातच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मयत मारुतीची पत्नी तथा आरोपीची आई पारूबाई मारुती रघुपती यांनी रामतीर्थ पोलिस ठाण्याला दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

लिंबगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा

तर दुसऱ्या घटनेत नांदेड शहरातील खडकपूरा भागात राहणारे चार मित्र मंगळवारी (ता. २६) रात्रीच्या वेळी गोदावरी नदीच्या हस्सापूर परिसरात दारु पिण्यासाठी गेले होते. जुन्या वादातून महमद वाजीद महमद गौस याच्या पोटात खंजरने मारून त्याचा खून केला. ही घटना हस्सापूर ते नसरतपूर परिसरात घडली. सुरवातीला माहिती मिळताच पोलिसांच्या हद्दीवरुन बरीच चर्चा झाली. नांदेड ग्रामिण, वजिराबाद आणि लिंबगावच्या सिमेवर ही घटना घडली. शेवटी रात्री उशिरा लिंबगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विष्णुपूरीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वांभर पल्लेवाड यांनी आरोपी गुड्डु, शाहरुख आणि इरफान या तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजार गणेश गोटके करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two murders in Nanded district create tension, law and order issue