बाभळीचे पाणी तेलंगणा राज्यात; एक दरवाजा उघडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020


धर्माबाद तालुक्यातील जनतेच्या लढ्यामुळे बाभळी बंधाऱ्यास शासनानी मंजूरी दिली आहे. सदरील बंधाऱ्याचे बांधकाम करण्यासाठी शासनाचे २२५ कोटी रुपये खर्च झाले आहे. बाभळी बंधाऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार होता. परंतु आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी बंधाऱ्यामुळे संपूर्ण आंध्रप्रदेशात वाळवंट होणार असल्याचा कांगावा करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेक षडयंत्र रचले होते.

धर्माबाद, (जि. नांदेड) : तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्रिस्तरीय समितीच्या सदस्यांपुढे बुधवारी (ता.एक) सकाळी दहा वाजता पहिला दरवाजा उघडण्यात आला असून बंधाऱ्याचे संपूर्ण दरवाजे उघडण्याची प्रक्रिया दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण दरवाजे उघडल्याने बंधाऱ्यातील पाण्याचा संपूर्ण साठा तेलंगणा राज्यात गेल्यामुळे बाभळी बंधारा कोरडाठाक पडला आहे.

बाॅँब टाकून उडवून देण्याची धमकी
ऐव्हढेच नसून बाभळी बंधाऱ्यावर बाॅँब टाकून उडवून देण्याची धमकी त्यावेळेस दिली होती. सदरील बाभळी बंधाऱ्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासन करून पोष्टमॅनची भूमिका बजावित आहे. (ता.एक) जुलै रोजी त्रिस्तरीय समितीच्या सदस्यांपुढे बाभळी बंधाऱ्याचा पहीला दरवाजा सकाळी दहा वाजता उघडण्यात आला आहे. तसेच उर्वरित १३ दरवाजे दुपारी चार वाजेपर्यंत उघडण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा -  कोरोना ब्रेकिंग - नांदेडला पाच पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३९६ वर
 

दरवाजे उघडले त्या वेळी एन. श्रीनीवासराव कार्यकारी अभियंता, गोदावरी डिव्हीजन केंद्रीय आयोग हैदराबाद, बी.रामराव कार्यकारी अभियंता श्रीराम सागर पोचमपाड, एन. पी. गव्हाणे कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग) नांदेड, ए.व्ही. पडवळ (उपविभागीय अभियंता, बाभळी) एस. बी. देवकांबळे, कनिष्ठ अभियंता, एस. बी. कांबळे कनिष्ठ अभियंता, एम. बी. अडसुळे कनिष्ठ अभियंता, आर. के. मुक्कावार, डि. एल. पांडे, गुडेवाड, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, जमादार नागूलवार, संतोष अनेराय, सलीम पठाण शेख, तलाठी भालचंद्र कदम, बडगावे, बोचावार, रमेश गुंजकर, बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर, सचिव जी. पी. मिसाळे, पत्रकार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

पावसाचे पाणीही वाहून जाणार
बंधाऱ्याचे सर्व १४ दरवाजे उघडल्यामुळे बंधाऱ्यातील ०.६२८ टिएमसी म्हणजे १७.८० दशलक्ष घनमीटर पाणी तेलंगणा राज्यात वाहून गेल्यामुळे बंधारा कोरडाठाक पडला आहे. तसेच सदरील उघडलेले १४ दरवाजे (ता.२९) आक्टोबर पर्यंत उघडे राहणार असल्यामुळे पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पाणीही वाहून जाणार असल्यामुळे सदरील बाभळी बंधारा हा सुसाईड पॉईंट ठरला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील फुलेनगर येथील एका युवकाने परीक्षेत अपयश मिळाल्यामुळे बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhabali Dam water In The State Of Telangana; One Door Opened, Nanded News