esakal | कौतुकास्पद! नांदेडच्या भाग्यश्रीची टोकियोतील पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

कौतुकास्पद! नांदेडच्या भाग्यश्रीची पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: टोकियो येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेचा भारतीय संघ जाहीर झाला. या संघात येथील अष्टपैलू आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा समावेश झाला.
नवी दिल्ली येथे ता. २९ व ता. ३० जूनला पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर २४ जणांची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्यातील चार महिला खेळाडूंमध्ये भाग्यश्री जाधवचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्रीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कास्य पदकांची कमाई केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या चीन येथील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत तिने दोन कांस्य पदके मिळवून त्यावर भारताचे नाव कोरले.

या स्पर्धेत सहभागी झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांग खेळाडू होती. २०२१ मध्ये दुबई येथे झालेल्या फाजा पॅरा अथेलेटिक्स ग्रँड प्रिक्स या जागतिक स्पर्धेतदेखील तिने गोळाफेकमध्ये रौप्यपदक तर भालाफेक या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवून भारताची शान राखली होती. ऑलिंपिक व एशियन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे तिचे तिचे स्वप्न होते. खांद्याला जबर दुखापत झालेली असतानादेखील तिचा स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करीत यशोशिखर गाठण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

गोळाफेकमध्ये करणार प्रतिनिधित्व
गोळाफेक या क्रीडा स्पर्धेत एफ ३४ या वर्गवारीत ती पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये टोकियोमध्ये ऑलिंपिकनंतर पॅरा ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत. या जागतिक क्रीडा स्पर्धेत आपण भारताच्या तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवीत पदकाची कमाई करू, असा आत्मविश्वास तिने बोलून दाखवला. आपल्या क्रीडा जीवनातील अंतिम ध्येय गाठण्यासाठी माझे मुख्य प्रशिक्षक श्री. सत्यनारायण यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले, अशी कृतज्ञता तिने व्यक्त केली आहे.

loading image