Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा आली... अन् हवा बदलून गेली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra Maharashtra

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा आली... अन् हवा बदलून गेली!

अर्धापूर : लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी सरकार विरोधी वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांशी संपर्क वाढावा लागणार आहे. भारत जोडो यात्रेमुळे कार्यकर्त्यांना उत्साहाचा बुस्टर डोस मिळाला असून आत्मविश्वास दुनावला आहे. यात्रेतील सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग हे यात्रेचे यश असले तरी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती देण्याची संधी मिळाली होती. तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघांतील तालुका आहे. त्यामुळे एक विशेष जबाबदारी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होती.

तालुक्यातील नियोजनावर चव्हाण यांचे लक्ष होते. यात्रेच्या आगमनाच्या दिवशी सकाळी पाच वाजताच शहरात दाखल होवुन तयारीचा आढावा घेतला.

सर्वसामान्य नागरिक वाढती महागाई, बेरोजगारी शेतमालाला भाव, आदी जीवन मरनाच्या प्रश्नांनी त्रस्त झाली आहेत. या बाबत नागरिकांतून तीव्र संताप आहे. या संतापाला फुंकर घालून सरकार विरोधी वातावरण निर्माण करण्याची संधी यात्रेमुळे उपलब्ध झाली.

यात्रा ज्या भागातुन गेली त्या भागातील नागरिक रस्त्यांच्या दुतर्फा, इमारतीच्या गच्चीवर जागा मिळेल तिथे उभे राहून खासदार राहुल गांधी यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी धडपड करित होते. यात अबालवृद्ध, तरुण, महिला, विद्यार्थी, सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग होता. हे सर्व नागरिक आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

आम आदमी जोडो, गटबाजी छोडो

या यात्रेमुळे निर्माण झालेला जोश येणाऱ्या काळातील विविध निवडणुकीत कामी येवू शकतो. भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांनी काढुन एक वेगळा उत्साह निर्माण केला आहे. आता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आम आदमी जोडो, गटबाजी छोडो अभियान सुरू करावे लागणार आहे. नाही तर यात्रा आली, यात्रा गेली आमची गाडी काही पुढे गेलीच नाही असे म्हणण्याची वेळ काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर आल्याशिवाय राहणार नाही.

उर्जा निर्माण करणारी यात्रा

तालुक्यातील व जिल्हा पातळीवर जबाबदारी सांभाळणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना खासदार राहुल गांधी यांच्या सोबत चालण्याचा योग आला. ही भेट आमच्यासाठी प्रेरणादायी व उर्जा निर्माण करणारी झाली. यात्रेचा सकारात्मक प्रभाव येणाऱ्या काळात दिसून येईल अशा भावना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, युवकचे जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे शहराध्यक्ष राजू शेटे, शिवलिंग स्वामी, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसबीर खतीब, राजू कल्याणकर, राजु बारसे, प्रवीण देशमुख व्यंकटी राऊत यांनी व्यक्त केल्या.