अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा

file photo
file photo

नांदेड : तमलूर (ता.देगलूर) येथील एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. घटनास्थळावरील संशयित साहित्यावरून देगलूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकाराचा छडा लावला आहे. संशयास्पद मृत्यूचे खुनात रूपांतर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यात अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने खून केल्याचे स्पष्ट झाले. 

अपघात दाखविण्याचा प्रयत्न
तमलूर येथील भीमराव रामा सुर्यवंशी (वय ४०) या  व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. हा मृत्यू घात की अपघात अशा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने या प्रकरणाचे गुढ शवविच्छेदन अहवाल बाहेर आल्यानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगीतले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या घटनेची दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार घटनास्थळावरील संशयित साहित्यावरून पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली. 

अनैतिक संबधाला अडसर ठरला कारणीभूत
मंडगी येथील नागोराव देवराव लोणे याचे तमलुर येथील भिमराव रामा सूर्यवंशी यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधास पती भीमराव सूर्यवंशी हा अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याचा डाव दोघांनी रचला. ठरलेल्या कटानुसार सोमवारी (ता.११) सकाळी अकराच्या सुमारास नागोराव लोणे याने तमलूर येथून दुचाकीवरून भीमराव सूर्यवंशी यास तमलूर रस्त्यालगत असलेल्या एका झाडाखाली दारू पिण्याचा बहाणा केला.

हेही वाचलेच पाहिजे.....अवकाळीमुळे कमाल तापमानात घट

दारुत मिसळले विष
दारू पिते वेळेस गाडीतील पाण्याची बाटली घेऊन ये असं म्हणत भीमराव यास गाडीकडे पाठवून त्याच्या दारूच्या ग्लासात वीष मिसळले. त्यानंतर त्यात पाणी मिसळून भीमराव यास दारू पाजली. थोड्याच वेळात विषारी द्रवामुळे त्याच्या पोटात वेदना होऊन घसा कोरडा पडला. अशा अवस्थेत नागोराव लोणे याने शेतालगत असलेल्या नाली जवळ नेऊन त्याचे डोके नालीवर आदळून अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाला. यात तो जागेवर गतप्राण झाल्याची माहिती लोणे याने पोलिसांना दिली होती. 

पोलिस अधिक्षकांनी घेतली दखल
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक व ठसे तज्ञांना पाठवून घटनेची माहिती जाणून घेतली. यानंतर पोलीस अधीक्षक श्री. मगर, उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी या प्रकरणाचा छडा लावला. तीन दिवसानंतर आरोपी नागोराव लोणे यास तेलंगणातील कोटचीर तर त्याच्या पत्नीस तमलूर येथून गुरुवारी (ता. १४) अटक केली. या घटनेमुळे देगलूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com