बिलोली : खूनप्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 5 August 2020

बिलोली प्रथमवर्ग न्यायालयात विनंती करून खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत असा अर्ज केला. बिलोली प्रथमवर्ग न्यायालयाने कुंडलवाडी पोलीसांना गुन्हा दाखल करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार कुंडलवाडी येथे गुन्हा दाखल झाला.

नांदेड : एका युवकाच्या मृत्यू प्रकरणात दाखल झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात बिलोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी सहा आरोपींचा अटकपुर्व जामीन अर्ज मंगळवारी (ता. चार) फेटाळून लावला आहे. त्यामुळे मारकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ता. १९ जानेवारी २०२० रोजी सुरेश रामा घारके (वय २५) या युवकाचा मृतदेह विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबाला नॉयलॉनच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. याबद्दल कुंडलवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू दाखल केला होता. पण सुरेशचे वडील रामा महादु घारके यांनी माझ्या मुलाचा खून झाला आहे आणि तो पुर्व दुश्मनीचा बदला काढण्यासाठी करण्यात आला आहे. हा प्रकार ज्ञानेश्वर घारके, गंगाधर घारके, लक्ष्मण घारके, नागनाथ देवकर, गंगाराम गोलोर, सायबु घारके यांनी केला आहे. पोलीसांनी रामा घारकेच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी ॲड. जगदीश हाके यांच्यावतीने बिलोली प्रथमवर्ग न्यायालयात विनंती करून खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत असा अर्ज केला. बिलोली प्रथमवर्ग न्यायालयाने कुंडलवाडी पोलीसांना गुन्हा दाखल करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार कुंडलवाडी येथे गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा  नांदेड शहरात चोरट्यांचा धुमाकुळ, एकाच रात्री तीन दुकाने फोडली

न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी फेटाळला

वरील सर्व सहा आरोपींनी बिलोली जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक ११९/२०२० दाखल केला. फिर्यादीच्यावतीने ॲड. जगदीश हाके यांनी शपथपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील ॲड. संदीप कुंडलवाडीकर यांनी काम पाहिले. युक्तीवाद ऐकूण न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी सर्व आरोपींचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

मारेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली 

अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी आता मारेकऱ्यांना उच्चन्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. मात्र त्यांच्या मागावर सध्या कुंडलवाडी पोलिस असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मयताच्या वडिलांनी आम्हाला न्याय मिळावा असा अर्ज न्यायालयात वकिलामार्फत यापूर्वीच दाखल केल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biloli: Pre-arrest bail of murder accused rejected nanded news