बिलोली: लॉटरीच्या नावाखाली एकाला ५२ हजाराचा गंडा

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 24 June 2020

तुम्हाला पाहिजे नसल्यास १५ हजार रुपये घ्या किंवा नको असल्यास तुमच्याकडील दोन तोळे सोने पावतीसह द्या असे म्हणून ५२ हजाराचे सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

नांदेड : तुम्हाला ॲक्टीव्हा गाडी आणि अडीच तोळे सोन्याची लॉटरी लागली आहे. तुम्हाला पाहिजे नसल्यास १५ हजार रुपये घ्या किंवा नको असल्यास तुमच्याकडील दोन तोळे सोने पावतीसह द्या असे म्हणून ५२ हजाराचे सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. हा प्रकार दगडापूर (ता. बिलोली) येथे ता. १८ जून रोजी घडला. 

दगडापूर (ता. बिलोली) येथील हॉटेल चालक महेबूबखान गफारखान पठाण (वय ५६) हे ता. १८ जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास घरी होते. यावेळी त्यांच्या घरी अनोळखी दोन युवक गेले. पठाणसाहेब घरी आहेत का असा आवाज देताच महेबुब पठाण बाहेर आले. यावेळी या दोन्ही युवकांनी आपणास ॲक्टीव्हा गाडी व अडीच तोळे सोन्याची लॉटरी लागली आहे. ते आपणास देण्यासाठी आम्ही आलो आहे. लॉटरी लागल्याचा आनंद पठाण यांना झाला. त्यांनी या दोन्ही अनोळखी युवकांना घरात बोलावून घेतले. 

हेही वाचाVideo - बोगस सोयाबीन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची छावाची मागणी

५२ हजार २९० रुपयाचा ऐवज लंपास
 
यावेळी जर तुम्हाला लॉटरीतील ॲक्टीव्हा गाडी आणि सोने पाहिजे नसल्यास आमच्याकडील १५ हजार रुपये तुम्ही घ्या. आम्ही तुम्हाला लागलेल्या वस्तु ठेवून घेतो. जर तुम्हाला ॲक्टीव्हा व सोने पाहिजे असल्यास तुमच्याकडील दोन तोळे सोने बील पावतीसह द्यावे लागेल. असे म्हणताच कानातील झुमके (दहा ग्राम) व गळ्यातील सेवनपीस (सात ग्राम) असे ५२ हजार २९० रुपयाचा ऐवज घेतला. महेबुबखान पठाण यांना आपल्या दुचाकीवरुन बिलोली येथे ॲक्टीव्हा शोरुमला नेले. तेथे गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा रंग कोणता पाहिजे असे विचारले. तसेच तुमचे आधारकार्ड व इतर कागदपत्राचे झरॉक्स द्यावे लागतील. 

येथे क्लिक कराVideo - नांदेडची केळी इराणला, ‘या’ कंपनीचा पुढाकार, वाचा

अनोळखी युवकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

महेबुबखान हे झेरॉक्स आणण्‍यासाठी शोरुमच्या बाहेर गेले असता सोन्याचे दागिणे घेतलेल्या दोन्ही अनोळखी चोरट्यांनी तेथून पोबारा केला. झेरॉक्स घेऊन आल्यानंतर पाहतात तर हे दोन्ही युवक त्यांना तिथे दिसले नाही. त्यांनी शोरुममध्ये लॉटरीसंदर्भात माहिती घेतली असता असा काही प्रकार आमच्याकडे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी मात्र त्यांना धक्का बसला. घडलेला प्रकार त्याने आपल्या घरी सांगुन बिलोली पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना माहिती देऊन तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी केली. शेवटी महेबुबखान पठाण यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी युवकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. केंद्रे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biloli: Under the name of lottery, one gets Rs 52 thousand nanded news