दूध उत्पादकांच्या मदतीला भाजप शनिवारी रस्त्यावर उतरणार, काय आहेत मागण्या ? 

प्रल्हाद कांबळे
Friday, 31 July 2020

दुधाला प्रति लिटर दहा रुपये जादा भाव देण्यात यावा, दूध भुकटी ला ५० रुपये अनुदान मिळाले या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या एक ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर दूध संकलन केंद्रावर आणि तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

नांदेड : राज्यात महाविकास आघाडीने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला मिळत असतनाही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देण्यात आला नाही. त्यामुळे दुधाला प्रति लिटर दहा रुपये जादा भाव देण्यात यावा, दूध भुकटी ला ५० रुपये अनुदान मिळाले या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या एक ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर दूध संकलन केंद्रावर आणि तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील दळभद्री महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले. हजारो लोक मृत्यूमुखी पडत असतानाही राज्य सरकार कोणत्याही उपाययोजना करत नाही. शिवाय केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे आणि निर्देशांचे तंतोतंत पालन केले नसल्यामुळे महाराष्ट्र कोणाच्या घशात अडकत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दुधाला प्रति लिटर दहा रुपये जादा भाव मिळावा, दूध बुकटीला 50 रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष, महायुतीच्यावतीने ता. २१ जुलैला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन एक ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आतापर्यंत दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने ता. एक ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अविनाशजी महालेकर, विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

हेही वाचाकोरोना : नांदेड जिल्ह्यात दीड लाख लोकांचे सर्वेक्षण

मास्क बांधून आंदोलनात सहभागी व्हा

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार येत्या ता. एक ऑगस्ट रोजी अर्थात क्रांतिदिनी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर दूध संकलन केंद्रावर, प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या या आंदोलनात माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, आमदार भीमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दूध उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक संघटना यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP on the streets on Saturday to help milk producers what are the demands nanded news